एचएसआरपी नंबर प्लेट जोडणीला वादाची फोडणी, काही केंद्रांनी यादीतून हटवले नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST2025-04-09T18:20:33+5:302025-04-09T18:22:49+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : शहरातील विविध दुचाकी शोरूममध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवायला गेल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटत ...

संग्रहित छाया
अतुल आंबी
इचलकरंजी : शहरातील विविध दुचाकी शोरूममध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवायला गेल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटत आहे. जुन्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी लागणारा साचा तसेच अन्य खर्च कोण घालणार, यावरून ग्राहक व जोडणी केंद्र यांच्यात दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे काही प्रमुख दुचाकी शोरूमनी जोडणी केंद्राच्या ऑनलाइन यादीतून आपले नाव हटविले आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत योग्य खुलासा करण्याची मागणी होत आहे.
सन २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी वाहनधारक ऑनलाइन बुकिंग करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना त्यामध्ये नवनवीन अडचणी निर्माण होत आहेत. अनेकांना ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याने ते खासगी केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी जातात. त्या वाहनधारकांकडून बुकिंगसाठी १०० ते २०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
५३१ रुपये भरल्यानंतर संबंधित वाहनधारकाला केंद्र व जोडणी तारीख दिली जाते. परंतु, प्रत्यक्षात केंद्रावर परिस्थिती वेगळीच असते. तेथे गेल्यानंतर जुन्या दुचाकीला नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी अन्य संच (ब्रॅकेट) बसवावे लागते. त्याचा खर्च हा संबंधित वाहनधारकाने द्यावा, अशी मागणी केंद्रचालकाकडून होते. परंतु, ग्राहक अन्य खर्च देण्यास तयार नाहीत.
५३१ रुपयांमध्ये काहीही करून नंबर प्लेट बसवून द्या. तो तुमचा प्रश्न आहे, असे सांगत आहेत. जोडणी केंद्राला एका नंबर प्लेटमागे ५० रुपये मिळतात. त्यामध्ये अन्य साहित्य जोडावे लागल्यास त्याचा खर्च १०० ते २५० रुपयांपर्यंत जातो. तो कोण घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या कारणावरून ग्राहक व केंद्रचालक यांच्यात दररोज वादविवाद होत असून, काही केंद्रचालकांनी ऑनलाइन नोंदणी यादीतून आपल्या केंद्राचे नाव हटविले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा अडचणी येणार आहेत. यात शासनाने लक्ष घालून योग्य मार्ग काढावा आणि तसा खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
नंबर प्लेट जोडणीसह ऑनलाइन ५३१ रुपये भरले असताना बोरगावे टीव्हीएस या जोडणी केंद्रावर ब्रॅकेटचा खर्च सोडून अधिकचे १०० ते २०० रुपये मागितले जात आहेत. ते न दिल्यास जोडणी परवडत नसल्याचे सांगत ग्राहकांना उद्धट उत्तरे दिली जात आहेत. - उमेश दुधाणे, ग्राहक
नवीन नंबर प्लेट जोडणीसाठी ५३१ रुपयांमधून फक्त ५० रुपये जोडणी केंद्राला दिले जातात. त्यामध्ये ब्रॅकेट अथवा अन्य साहित्य लागल्यास त्याचे पैसे कोण देणार, यावरून वाद होत असल्याने आम्ही दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन नोंदणी यादीतून आमच्या केंद्राचे नाव हटविले आहे. - राजू बोरगावे, जोडणी केंद्रचालक