चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन वाद, मेघराज राजेभोसलेंनंतर धनाजी यमकरांनीही जाहीर केली दुसरी तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:41 AM2022-09-17T11:41:31+5:302022-09-17T11:41:56+5:30
मेघराज हे महामंडळाचे अध्यक्ष नाहीत; त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली निवडणूक बेकायदेशीर आहे. दम असेल तर त्यांनी आम्ही जाहीर केलेली निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यमकर यांनी दिले.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील राजकारण आता शह-काटशहावर आले असून, अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यानंतर आता बहुमत असलेल्या कार्यकारिणीने शुक्रवारी नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उपाध्यक्ष धनाजी यमकर व प्रमुख कार्यवाह बाळा जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मेघराज हे महामंडळाचे अध्यक्ष नाहीत; त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली निवडणूक बेकायदेशीर आहे. दम असेल तर त्यांनी आम्ही जाहीर केलेली निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यमकर यांनी दिले. राजेभोसले यांनी जाहीर केल्यानुसार २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
यमकर म्हणाले, मेघराज यांना कार्यकारिणीने बहुमताने पदमुक्त करून सुशांत शेलार यांची निवड केल्याने त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार नाही. महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर नाही; त्यामुळे धर्मादायच्या घटनेनुसार कार्यकारिणी बहुमताने अध्यक्ष किंवा संचालकांची निवड किंवा त्यांना पदमुक्त करू शकतात. आमची कार्यकारिणीत बहुमतात असल्याने हीच निवडणूक अधिकृत असणार आहे. ॲड. के. व्ही. पाटील हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील. पराग भौसार, अशोक सासने, संतोष साखरे, आनंद कुलकर्णी व अरुण भोसले-चोपदार ही निवडणूक समिती आहे.
या वर्षीचे लेखापरीक्षण सुरू असल्याने मेघराज यांनी खोटे सांगितले आहे. सगळ्या पावत्या, बिले कोल्हापूरच्या मुख्य कार्यालयात असताना ते नेमके कुठे आणि कुणाकडून लेखापरीक्षण करून घेत आहेत हे दाखवावे. गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षण परस्पर धर्मादायला सादर केले आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- उमेदवारी अर्ज वाटप : १० ते १५ ऑक्टोबर
- अर्ज स्वीकारणे : १७ व १८ ऑक्टोबर
- माघार : २७ व २८ ऑक्टोबर
- मतदान : १३ नोव्हेंबर, निकाल : १५ नोव्हेंबर
सभासदांनाच सभा नको आहे
गेल्या पाच वर्षांत महामंडळाला लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. तो समोर यावा यासाठीच आम्ही मेघराज यांना वारंवार कार्यकारिणीची बैठक, सर्वसाधारण सभा घेऊन निवडणूक जाहीर करूया, अशी मागणी केली. त्यासाठी काही दिवस कार्यालय बंद केले तरीही त्यांनी बैठक घेतली नाही. आता सभासदांनाच निवडणूक घ्या, म्हणून मोर्चा काढायला लावला. सभासदांनाच सर्वसाधारण सभा नको असेल तर आम्ही काय करणार? अशी विचारणा यमकर यांनी केली.