टाकाळा खणीवरून वादंग

By admin | Published: April 17, 2015 11:18 PM2015-04-17T23:18:34+5:302015-04-18T00:07:29+5:30

कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले : महापालिका राजारामपुरीतील कचरा उठाव बंद करणार

The controversy over the hoof | टाकाळा खणीवरून वादंग

टाकाळा खणीवरून वादंग

Next

कोल्हापूर : टाकाळा खणीत ‘लॅँडफिल साईट’ (भूमी पुनर्भरण क्षेत्र) कोणत्याही परिस्थितीत १५ मेपूर्वी तयार करा; अन्यथा टोप येथील खणीबाबत वेगळा विचार केला जाईल, असे पुण्यातील हरित लवादाने स्पष्ट केले आहे. मात्र, येथे अशा प्रकारचे क्षेत्र करण्यास राजारामपुरीतील काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे. यातून गेले आठ ते दहा दिवस हे काम बंद आहे. सोमवारी (दि. २०) हे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. यावेळी विरोध झाल्यास सोमवारनंतर राजारामपुरी परिसरातील कचरा उठाव बंद केला जाईल, असा इशारा उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
टाकाळा येथील ११८०/क या ३.२४ आर क्षेत्रातील खणीची जागा बगीचासाठी आरक्षित करण्यात आली आहे. परंतु, त्यापूर्वी याठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून झूम येथील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून तो कचरा टाकून खण भरण्याची योजना आहे. या खणीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी थेट कचरा न टाकता फक्त झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून उर्वरित ‘रॉ मटेरिअल’च टाकण्याचे बंधन प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातले आहे. खणीत सध्या असणारे पाणी व जलपर्णी हटवून सभोवती मोठी भिंतही उभारली आहे. अद्याप ५० टक्के भिंत उभारणीचे काम बाकी आहे.
दरम्यान, टाकाळा खणीत कचरा टाकण्यास सुरुवात झाल्यानंतरच कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे शहराचे पाऊल पडणार आहे. झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खणीतील योजनेस आंदोलकांमुळे उशीर होत आहे. महापालिकेने थेट कचरा टाकल्यानंतर विरोध करणे योग्य आहे. १० वर्षे जुन्या कचऱ्यातील चाळून झालेले घटक वेगळे केल्यानंतर ते या खणीत टाकले जाणार असल्याने विरोध चुकीचा असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


‘एमपीसीबी’च्या निकषानुसारच कचरा टाकणार
लँडफिल्ड साईटचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाल्यानंतर होणारा विरोध अनाकलनीय आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) घालून दिलेल्या अटी व निकषानुसार येथे ‘झूम’मधील कचरा टाकला जाणार आहे. असे असताना निव्वळ जर-तरच्या निकषानुसार विरोध चुकीचा असल्याचे उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी सांगितले.


शास्त्रीय पद्धतीचा वापर
खण स्वच्छ केल्यानंतर जमिनीवर प्रदूषण नियंत्रण कायद्याने घालून दिलेल्या निकषांनुसारच शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे घटक बुजविले जाणार आहेत. खणीच्या तळाकडील भागात जाड प्लास्टिकचा थर अंथरला जाणार आहे. यानंतर काही थर कचरासदृश पदार्थ टाकून यावर माती व मुरूम टाकला जाणार आहे. अशा पद्धतीने थर तयार करीतच ही खण बुजविली जाणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

मागील अनुभव पाहता महापालिका या खणीत प्रक्रिया न करताच कचरा टाकण्याची शक्यता आहे. खण परिसरात १०८ झोपड्या व तीन मोठ्या रुग्णालयांसह दाट लोकवस्ती आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रक्रिया केलेलाच कचरा टाकणार असल्याची ठाम ग्वाही प्रशासन देत नसल्याने विरोध करीत आहे. विरोधाला विरोध म्हणून नाही.
- दुर्गेश लिंग्रस,
शिवसेना शहरप्रमुख

Web Title: The controversy over the hoof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.