माहिती अधिकारावरुन पालिकेत वादावादी
By admin | Published: July 7, 2017 05:46 PM2017-07-07T17:46:01+5:302017-07-07T17:46:01+5:30
मुख्याधिकारी-आंदोलन अंकुश कार्यकर्त्यातील प्रकार
आॅनलाईन लोकमत
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर), दि. 0७ : नगरपालिका निवडणुकीची माहिती माहिती अधिकाराखाली मागण्यावरुन जयसिंगपूरचे मुख्याधिकारी यांच्या केबीनमध्ये आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांत वादावादीचा प्रकार शुक्रवारी घडला.
चिपरी येथील मतदारांचा जयसिंगपूरच्या मतदार यादीत समावेश याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार माहिती देता येत नसल्याने या वादावर तात्पुरता पडदा पडला. आंदोलन अंकुशचे अभिजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांची भेट घेतली.
माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचे विचारले. पालिका कोषागार कार्यालयाकडे बोट दाखवते. तर कोषागार कार्यालयाने याबाबतची माहिती पालिकेनेच द्यावी, असे कळविल्याचे मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले. यावरुन मुख्याधिकारी तेली व कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी तेली म्हणाले, निवडणूक कायद्यानुसार माहिती दाखविता येत नाही. याबाबत न्यायालयात दाद मागावी लागते. आंदोलन अंकुशचे अभिजित पाटील म्हणाले, नगरपालिका निवडणूकीत बोगस मतदान झाल्याची शंका आहे. चिपरी येथील मतदारांचा पालिकेच्या यादीत समावेश असल्याने ही माहिती मागविली आहे.