शिरढोणमध्ये वीज तोडणीवरून वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:00+5:302021-03-16T04:25:00+5:30
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडण्यास आलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अन्याय निवारण कृती समितीच्या ...
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडण्यास आलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हाकलून लावले. शाब्दिक वादावादीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर महावितरणचे कुरुंदवाड विभागाचे सहायक अभियंता सिकंदर मुल्ला यांनी कर्मचाऱ्यांना वीज न तोडण्याचे दूरध्वनीवरून सांगितल्याने वीज कनेक्शन न तोडताच निघून गेले.
दरम्यान, वीज बिल विरोधात बुधवारी (दि. १७) येथील महावितरण कार्यालयावर कृती समितीच्यावतीने मोर्चा काढणार असल्याची माहिती समिती प्रमुख विश्वास बालीघाटे यांनी दिली. लॉकडाऊन कालावधीत शेतीची व घरगुती वीज बिले वाढून आल्याने त्याची दुरुस्ती व्हावी व थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडण्यात येऊ नये, यासाठी येथील महावितरण कार्यालयासमोर एक महिन्यापूर्वी समितीच्यावतीने उपोषण केले होते. यावेळी लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत शासन निर्णय होईपर्यंत वीज ग्राहकांची वीज कनेक्शन न तोडण्याचे व चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन सहायक अभियंता मुल्ला यांनी उपोषणकर्त्यांना दिले होते. वीज ग्राहकांनी लॉकडाऊन काळातील चार महिन्यांची बिले राखून ठेवून उर्वरित बिल भरले असताना सोमवारी दुपारी महावितरण कर्मचाऱ्यांनी उर्वरित वीज बिलाच्या वसुलीसाठी घरगुती वीज कनेक्शन तोडण्यासाठी आल्याने वाद झाला. बालिघाटे, शाबुद्दीन टाकवडे, विजय सूर्यवंशी आदि कार्यकर्ते आल्याने वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी बालीघाटे यांनी अधिकारी मुल्ला यांना उपोषण ठिकाणी दिलेल्या लेखी अश्वासनाची आठवण करून दिल्याने अधिकारी मुल्ला यांनी कर्मचाऱ्यांना वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.