शिरढोणमधील विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:54 AM2019-09-10T10:54:11+5:302019-09-10T11:07:51+5:30
शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याच्या कारणातून विद्यालय बंद आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे.
गणपती कोळी
कुरुंदवाड शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याच्या कारणातून विद्यालय बंद आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे.
शाळा ‘रयत’ची आणि इमारत स्थानिक शिक्षण संस्थेची, त्यामुळे इमारत दुरुस्ती व देखभालीवरून वाद सुरूअसून, दोघांच्याही प्रतिष्ठेत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातून गावात तेढ निर्माण होत आहे; त्यामुळे प्रतिष्ठेपेक्षा गाव व विद्यार्थी यांच्या हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे.
लोकसंख्या १0 हजार असलेल्या या गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाला स्वत:ची इमारतीची सोय व्हावी; यासाठी १९७९ साली दिवंगत रमजानशेठ बाणदार व भरमू बालिघाटे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांकडून एकरी लोकवर्गणी काढून शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तीन मजली भव्य इमारत बांधण्यात आली.
शेतकरी शिक्षण संस्थेने ही इमारत रयत शिक्षण संस्थेला भाडेपट्टी स्वरूपात दिली. शासनाच्या अनुदानातून संस्थेला २००३ पर्यंत भाडे मिळत होते. भाडे रूपातील उत्पन्न बंद झाल्याने शाळेच्या इमारत दुरुस्ती, डागडुजीकडे शेतकरी शिक्षण संस्थेचे दुर्लक्ष झाले. परिणामी गेल्या सात-आठ वर्षांत इमारतीची पडझड सुरूआहे.
काहीवेळा वर्गात छताचा गिलावा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडला आहे; त्यामुळे इमारत दुरुस्त करण्याची मागणी पालकांतून होत होती. त्यातच आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात पहिला मजला पाण्यात गेल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत पालकवर्गातून अधिकच भीती व्यक्त केली गेल्याने पूर ओसरून महिना उलटला, तरी शाळा बंदच आहे.
शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून अहवाल येईपर्यंत इमारतीत शाळा भरवू नये, वर्ग भरविल्यास आणि काही दुर्घटना झाल्यास आपण जबाबदार असाल, अशा आशयाचे पत्र मुख्याध्यापकांना दिल्याने शिक्षकांनी जबाबदारी नाकारत शाळेचे वर्ग इतरत्र भरवले आहेत; त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे गोंधळ होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
इमारत शेतकरी शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याने दुरुस्तीसाठीचा खर्च करण्यास रयत शिक्षण संस्थेने असमर्थता दाखविली आहे, तर रयत शिक्षण संस्थाच इमारत वापरत असल्याने दुरुस्ती देखभाल त्यांनीच करावी, अशी भूमिका शेतकरी शिक्षण संस्थेने घेतल्याने या वादात विद्यार्थी व शिक्षकांची हेळसांड होत आहे.
पालकांनीही इमारत रयत शिक्षणकडे देण्याची मागणी केल्याने दोन गट निर्माण होऊन गावात वाद निर्माण झाला आहे; त्यामुळे प्रतिष्ठा, स्वार्थ बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शेतकरी शिक्षण व रयत शिक्षण संस्थेने सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी १५ ला करणार पाहणी
रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी विद्यालय इमारतीची पाहणी करून पालकांशी चर्चा केली. याची माहिती प्रा. पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली; त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई इमारतीच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी रविवारी (दि. १५) येणार असल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली.