350th Shivrajyabhishek Sohala 2023: वादंग निर्माण करायचे आहे का?; तिथीला सोहळा करण्याचे कारण काय, शिवप्रेमींचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:19 PM2023-06-03T12:19:23+5:302023-06-03T12:21:29+5:30
सरकारला एवढी कसली घाई झाली होती?
कोल्हापूर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते त्यांची समाधी कुणी शोधली इथपर्यंत अनेक वाद असताना आता शासनाला शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद निर्माण करण्याची हुक्की आली आहे की काय, असा संतप्त शिवप्रेमींकडून विचारला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अख्खे एक वर्ष गिळंकृत करत यंदा ३५० वा सोहळा तोही तिथीनुसार २ जूनला साजरा करण्याचं कारण काय? याला मूर्खपणा म्हणावा का? महाराजांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेला वादंगामध्ये अडकवून ठेवण्याचे षडयंत्र असा थेट आरोप सरकारवर केला जात आहे.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने यंदाच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक साेहळ्याचे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सव (३५० वे वर्ष) म्हणून त्याचे चुकीचे मार्केटिंग केले आहे, याबाबतचे वृत्त शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरातून वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे इत्थंभूत वर्णन असताना आता हे मुखपत्र, त्यावेळी काही विचार करून निर्णय घेणारे इतिहास संशोधक, दिग्गज नेतेमंडळी खोटी ठरली आहेत.
शासनाने केलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध करत शासनच जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांबद्दल वादंग निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे.
आधीच वाद कमी आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांवरून कोणतेही वादंग निर्माण होणे ही खरेतर सर्वांसाठी शरमेची बाब आहे. शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून तीन वेळा साजरी केली जाते. त्यांचे समाधिस्थान कित्येक वर्षे अंधारात होते, ते समाधिस्थान कोणी शोधले यावरून वाद आहेत. हे वाद कमी आहेत की काय म्हणून आता शासनाने ३५० वा शिवराज्याभिषेक साेहळा एक वर्ष आधीच साजरा करून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे.
तिथीला साेहळा का केला?
तिथीनुसार उत्सव साजरा करताना दरवर्षी वेगवेगळी तारीख येते. त्यामुळे ६ जून हाच दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जात असताना यावर्षी तिथीनुसार २ जूनला शासनाने हा सोहळा करण्यामागचे कारण काय? सरकारला एवढी कसली घाई झाली होती? आता ६ जूनला काय करणार आहात, अशी विचारणा शिवप्रेमींनी केली आहे.