शिवसैनिक-मनपा कर्मचाऱ्यांत वादावादी

By admin | Published: January 7, 2017 01:05 AM2017-01-07T01:05:49+5:302017-01-07T01:05:49+5:30

केबिन लावण्यावरून घडला प्रकार

Controversy in Shiv Sena-NMC staff | शिवसैनिक-मनपा कर्मचाऱ्यांत वादावादी

शिवसैनिक-मनपा कर्मचाऱ्यांत वादावादी

Next

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील महावीर उद्यानाला लागून केबिन लावण्यावरून शुक्रवारी शिवसैनिक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. नगरसेवक राहुल चव्हाण यांनी केबिन लावण्यास विरोध केल्याचा गैरसमज झाल्याने शिवसैनिक अधिकच संतप्त झाले. परंतु, पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर शिवसैनिकांनी स्वत:हून केबिन हटविल्या.
महावीर उद्यानाजवळील भिंतीला लागून गेल्या दोन वर्षांत अनेक लोखंडी केबिन, हातगाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काही महानगरपालिकेचे बायोमेट्रिक कार्ड असलेल्या केबिनचाही समावेश होता. एक महिन्यापूर्वी या ठिकाणच्या सर्व केबिन, हातगाड्या मनपा विभागीय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढल्या होत्या. केवळ ज्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड आहेत, अशांच्याच केबिन व हातगाड्या ठेवल्या होत्या. काढण्यात आलेल्या केबिनमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अमर सूर्यवंशी व जयवंत साळोखे यांच्या केबिनचा समावेश होता.
दरम्यान, आमच्याकडेसुद्धा बायोमेट्रिक कार्ड आहेत, असे सांगून साळोखे व सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूर्वीच्या ठिकाणी केबिन ठेवल्या. माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागास कळताच या विभागाचे प्रमुख पंडित पोवार व त्यांचे कर्मचारी तेथे पोहोचले. तुम्हाला येथे केबिन लावता येणार नाहीत, अशी समज त्यांनी दिली. त्यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यास तीव्र विरोध केला. यावेळी मनपा कर्मचारी व शिवसैनिक यांच्यात जोरदार वादावादी झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. याच परिसरात अन्य १३ केबिन लावण्यास परवानगी दिली जाते आणि आमच्या केबिन काढल्या जातात हा अन्याय आहे, असे शिवसैनिकांचे म्हणणे होते. त्यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पंडित पोवार यांनी, ज्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड आहेत, अशांनाच फक्त येथे परवानगी आहे, असे सांगितले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडेही कार्डे असल्याचा दावा केला. पोवार यांनी ती दाखविण्याचा आग्रह धरला. त्यावेळी घेऊन येतो, असे सांगून शिवसैनिक निघून गेले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता या केबिन स्वत:हून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हटविल्या.


नगरसेवक चव्हाण यांच्यावर आरोप
शिवसेना नगरसेवक राहुल चव्हाण यांनी शुक्रवारची कारवाई करायला भाग पाडल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या जयवंत साळोखे व अमर सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून ही माहिती त्यांना दिली. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी दररोज सायंकाळी सहा वाजता हातगाडी लावणे आणि रात्री नऊ वाजता काढणे, या अटीवर त्यांना परवानगी देण्याची विनंती मनपा कर्मचाऱ्यांना केली. चव्हाण, साळोखे, सूर्यवंशी यांच्यात बैठक घेऊन आमदार क्षीरसागर यांनी एकमत घडवून आणले.

Web Title: Controversy in Shiv Sena-NMC staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.