आत सोडण्यावरून जिल्हा परिषदेत वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:10 PM2020-09-08T19:10:43+5:302020-09-08T19:12:39+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी असतानाही अनेकांनी दारात येऊन आज कर्मचाऱ्यांशी सोडण्यासाठी वाद घातला. परंतु कर्मचाऱ्यांनी खंबीर भूमिका घेत जवळजवळ ६०० हून अधिक जणांना परत पाठविले.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी असतानाही अनेकांनी दारात येऊन आज कर्मचाऱ्यांशी सोडण्यासाठी वाद घातला. परंतु कर्मचाऱ्यांनी खंबीर भूमिका घेत जवळजवळ ६०० हून अधिक जणांना परत पाठविले. रविवारपर्यंत जिल्हा परिषदेत इतरांसाठी प्रवेश बंद आहे तेव्हा कुणीही आत सोडण्यासाठी आग्रह करू नये, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सुमारे १४० अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तळमजल्यावरील महिला आणि बालकल्याण समिती सभापतींच्या स्वीय सहाय्यकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या आणि जिल्हा परिषदेतील वाढती गर्दी पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारपासून प्रवेश बंदी जाहीर केली. तरीही अनेकांनी सकाळपासून जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये प्रवेशासाठी गर्दी केली होती.