जिल्ह्यात कोअर बँकिंगची सोय
By admin | Published: February 12, 2015 11:43 PM2015-02-12T23:43:36+5:302015-02-13T00:54:05+5:30
दहा पोस्ट कार्यालये : आता पोस्टाच्या ग्राहकांनाही मिळणार बँकांप्रमाणेच सेवा
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा पोस्ट कार्यालयांत खातेदारांसाठी आॅनलाईन (कोअर बँकिंग) सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे देशातील कोणत्याही पोस्ट कार्यालयातील बचतीसह अन्य बँकिंगचे व्यवहार या कार्यालयामार्फत केले जाणार आहेत. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना आता बँकांप्रमाणे अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे. या सेवेचा लाभ कोल्हापुरातील लाखो ग्राहकांना होणार आहे. भारत सरकारच्या नवीन उपक्रमांतर्गत देशातील सर्वच्या सर्व १,५५,००० पोस्ट कार्यालयांतून बचत बँकेची सेवा आॅनलाईन (कोअर बँकिंग सेवा) सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोस्ट कार्यालयांत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवेद्वारे येत्या काही दिवसांत एटीएम सेवाही पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना बँकांप्रमाणेच सर्व अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांत एटीएम सेवाही चालू केल्यानंतर मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग या सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेत बँकेप्रमाणेच ग्राहकांना दहा अंकी आयडी क्रमांक दिला जाणार आहे. हा आयडीच सर्वत्र उपयोगी पडणार आहे.
गोवा क्षेत्रीय कार्यालयात डाक अदालत
पणजी (गोवा) येथे गुरुवारी (दि. २६) गोवा क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट कार्यालयांतील कर्मचारी, कामकाज, टपाल, स्पीड पोस्ट, कौंटर सेवा, बचत बँक, मनिआॅर्डर याबाबतच्या तक्रारींसाठी डाक अदालतीचे आयोजन केले आहे. ही डाक अदालत पोस्टमास्तर जनरल यांच्यासमोर होणार आहे. यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी पोस्टल सेवेचे सहायक संचालक राजशेखर भट यांच्या नावे पोस्टमास्तर, गोवा यांच्या नावे दोन प्रतींत पाठवून देण्याचे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, सिटी पोस्ट, कुरुंदवाड, हेड पोस्ट बावडा, बलभीम बँक पोस्ट कार्यालय, इचलकरंजी पोस्ट कार्यालय, शाहूपुरी पोस्ट, गडहिंग्लज, रेल्वे स्टेशन पोस्ट कार्यालय व शनिवार पेठ पोस्ट कार्यालय अशा दहा कार्यालयांत ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
कोअर बँकिंग प्रणालीमुळे पोस्टाच्या लाखो ग्राहकांना घरबसल्या पोस्टाच्या बँकिंग सेवा मिळणार आहेत. या प्रणालीत प्रत्येक ग्राहकाला आयडी दिला आहे. त्यानुसार हा आयडी देशातील इतर पोस्ट कार्यालयात चालू शकतो. तेथेही आपण व्यवहार करू शकतो. पोस्टाच्या लाखो ग्राहकांना या सेवेचा लाभ होणार आहे.
- एस. व्ही. मगदूम, सहायक पोस्टमास्तर,
शनिवार पेठ पोस्ट, कोल्हापूर.