लॉकडाऊनच्या भीतीने ठरावधारकांची तालुक्यात सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:58+5:302021-04-24T04:24:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीची दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून लॉकडाऊनच्या भीतीने ठरावधारकांना बाहेर नेण्यापेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीची दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून लॉकडाऊनच्या भीतीने ठरावधारकांना बाहेर नेण्यापेक्षा तालुक्यातच सुरक्षित ठेवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. साधारणत: ४०-५० ठरावधारक एकत्र राहू शकतील, अशी तालुक्यातील अज्ञातस्थळे शोधण्याचे काम सुरू आहे.
‘गोकुळ’चा प्रचार रंगात आला आहे, सत्तारूढ गटाच्या गाठीभेटी सुरू आहेत, तर विरोधी आघाडीने मेळाव्याच्या माध्यमातून संपर्क मोहीम राबवली आहे. मतदानासाठी अवघे आठ दिवस राहिल्याने राजकीय उलथापालथी वेगावल्या आहेत. ठरावधारकांशी संपर्क येऊ नये म्हणून सत्तारूढ गटाने उचला उचली सुरू केली आहे. चंदगड, आजरा तालुक्यातील काही ठरावधारकांना अज्ञातस्थळी हलवल्याचे समजते. त्यानंतर राधानगरी, भुदरगडसह इतर तालुक्यातील ठरावधारकांना हलवण्याचे नियोजन आहे. मात्र, लॉकडाऊन झाले तर परजिल्ह्यात नेलेले ठराव आणायचे कसे, असा प्रश्न आहे. त्यातून तालुक्यातच ४०-५० ठरावधारकांची सोय होईल, अशी अज्ञातस्थळे शोधली जात आहेत. साधारणत: येत्या दोन दिवसांत बहुतांशी ठरावधारकांना तालुक्यातील अज्ञातस्थळी पोहचवण्याची व्यूहरचना आहे.
राजकीय कुरघोडीची भीती
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष पहावयास मिळणार आहे. त्यातून राजकीय कुरघोड्या होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ठराव बाहेर नेले आणि लॉकडाऊन झाला तर कुरघोड्यातून अडचणीला सामोरे जावे लागेल, याची भीती आहे.