सोयीनुसार पक्ष वापरणाऱ्यांच्या माझ्याकडे कुंडल्या
By admin | Published: September 14, 2016 12:35 AM2016-09-14T00:35:54+5:302016-09-14T00:45:57+5:30
सतेज पाटील : जिल्हा परिषदेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीला तेवढं काँग्रेसबरोबर आणि विधानसभा, विधान परिषदेला मात्र सवता सुभा असे राजकारण करणाऱ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे दिला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. थोडक्यासाठी गेल्यावेळी इतरांची मदत घ्यावी लागली. मात्र, यावेळी स्वबळावर निवडणूक लढवून जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, तर प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक सदाशिव पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांनी यावेळी रोखठोक भूमिका मांडत मुळात कुरबुऱ्या का होतात, याच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘उमेदवारीसाठी कॉँग्रेस पाहिजे आणि कॉँग्रेसच्या गरजेवेळी मात्र कुणी नाही, असे उपयोगाचे नाही. अशा अनेकांच्या कुंडल्या काढता येतील. भाजपमध्ये कुणी जात असले तरी ही सूज आहे. पालकमंत्री पाटील यांनी गडहिंग्लजमध्ये वल्गना केली की, कॉँग्रेस संपवणार. मात्र, महापालिकेतही ते असेच म्हणत असताना तिथे काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिली. जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘मी पहिल्यापासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ आहे; त्यामुळे मला कोणी काही बोलू शकत नाही. मी सर्वांना बरोबर घेऊन जात असतो. जे झाले आहे ते सोडा. यापुढच्या काळात एकोप्याने काम करूया.’ दोन्हीकडची सत्ता का गेली याचे विवेचन करीत निरीक्षक सदाशिव पाटील म्हणाले,‘आम्ही इथं तुमच्यावर कारवाई करायला आलो नाही; तर समन्वयासाठी आलो आहोत. याआधी काय झाले यापेक्षा यापुढच्या काळात एकोप्याने राहून प्रदेश कॉँग्रेसला अभिप्रेत चांगले काम कोल्हापुरातून करून दाखवूया, स्वबळावर लढण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, अगदीच दयनीय स्थिती जिथे असेल तेथे नेत्यांशी चर्चा करून आघाडीचा निर्णय घ्यावा लागेल.
माजी आमदार बजरंग देसाई म्हणाले, ‘जी माणसं इतरांच्या स्टेजवर दिसतात, त्यांचंच कॉँग्रेसचे निष्ठावंत म्हणून कौतुक व्हायला लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या हस्ते कॉँग्रेसवाल्यांचे कार्यक्रम होत आहेत याचाही पक्षाने विचार करावा.’
माजी मंत्री भरमू पाटील म्हणाले,‘ मला विधानसभेसाठी कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली. मात्र, कॉँग्रेसच्या जिवावर खुर्च्यांवर आणि पदांवर बसलेली माणसं कुठं गायब झाली हे कळलंच नाही. त्यांनी मला फसवलं. आम्ही राष्ट्रवादीला मदत करून त्याचा परिणाम भोगला आहे.’ माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले,‘ आपण एकमेकांचे पाय ओढल्याने ही वाईट अवस्था आली आहे. नेता चुकीची भूमिका घेत असेल, तर त्याला सुनावण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. गटबाजीचे राजकारण आता तरी सोडूया.’ शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव म्हणाले, ‘फक्त नेते काय म्हणतात, यापेक्षा आता लोक काय म्हणतात, याकडेही लक्ष द्या.’ राज्य सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी प्रास्ताविक केले.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, सभापती अभिजित तायशेटे, किरण कांबळे, अॅड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर यांच्यासह तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पी. एन. यांचे नेत्यांकडून कौतुक
माजी मंत्री जयवंतराव आवळे, भरमूआण्णा पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पी. एन. यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आदरयुक्त भीती असल्याचे बजरंग देसाई म्हणाले. पी. एन. अध्यक्ष आहेत म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात एक प्रकारचा दबदबा असल्याचे भरमूअण्णा यांनी सांगितले. त्यांचा वचक आहे त्याचा वापर आता त्यांनी करावा, अशीही सूचना त्यांनी केली. काँग्रेस चालवणं सोपं नाही. मात्र, तुम्ही ती १८ वर्षे चालवताय, असे ते पी. एन. यांना उद्देशून म्हणाले. १८ वर्षे सलग अध्यक्ष म्हणून राज्यात पी. एन. एकटेच आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभेपर्यंत त्यांनाच अध्यक्ष ठेवावे, अशीही मागणी यावेळी जयवंतराव आवळे यांनी केली.
माणसं आणायची कुठून...
आम्ही कुणावर कारवाई करायला आलो नाही, असे निरीक्षक पाटील यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. आज ह्याला काढा, उद्या त्याला काढा, असं झालं तर माणसं कुठनं इंग्लंड-अमेरिकेतून बोटीतनं आणायची काय, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
गाड्या, बंगले सगळचं गेलं
अनेक वर्षे सत्तेत राहून सवय झालेली. मुंबई-पुण्याची सवय लागलेली. एका झटक्यात सायरनच्या गाड्या, बंगले हे सगळं गेलं. आम्हाला कधी घोषणा देऊन माहिती नाही. जे सत्तेवर आहेत त्यांना सत्ता राबवायला जमेना आणि आम्हाला चांगला विरोधही करता येईना, अशी परिस्थिती झाल्याचे पाटील म्हणाले.