‘सोयीच्या राजकारणाने’ राष्ट्रवादीची वजाबाकीच
By admin | Published: April 17, 2015 12:55 AM2015-04-17T00:55:12+5:302015-04-17T00:55:28+5:30
के. पी. पाटील : जिल्ह्यात पक्ष रुजविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज
राजाराम लोंढे - कोल्हापूर -गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल पाहिली तर पक्षात बेरजेपेक्षा वजाबाकीच अधिक झाल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले. ‘सोयीच्या राजकारणा’साठी नेतेमंडळींनी कागल, राधानगरी व चंदगड मतदारसंघांपुरता पक्ष मर्यादित ठेवल्याने उर्वरित ठिकाणी पक्षाचे अस्तित्व शोधावे लागत आहे. के. पी. पाटील यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असली तरी ‘सोयीचे राजकारण’ सोडून त्यांना जिल्ह्यात पक्ष रुजविण्यासाठी काम करावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर व निवेदिता माने या नेत्यांनी खऱ्या अर्थाने पक्ष जिल्ह्यात वाढविला. पहिल्याच निवडणुकीत पाच आमदार व दोन खासदार राष्ट्रवादीचे निवडून आले. जिल्हा बँक, बाजार समिती, साखर कारखान्यांसह सर्वच सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवून सामान्य कार्यकर्त्यांना उभारी दिली. मंडलिक, खानविलकर, निवेदिता माने, कुपेकर, विनय कोरे, हसन मुश्रीफ यांच्यासारखी धडाकेबाज नेत्यांची फळी पाहून कॉँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांची पक्षात येण्यास रीघ लागायची, पण अलीकडील दहा वर्षांत नेत्यांमधील चढाओढीची स्पर्धा, अंतर्गत कुरघोड्यांमुळे पक्षाला ओहोटी लागली. विनय कोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र पक्ष काढला. त्यानंतर मंडलिक-मुश्रीफ वादात मंडलिक, नरसिंगराव पाटील, लेमनराव निकम हे पक्षातून बाहेर पडले. खानविलकर यांचा करवीरमधून पराभव झाल्यानंतर त्यांना अपेक्षित बळ न मिळाल्याने त्यांच्याबरोबर ‘करवीर’मधील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले. व्ही. बी. पाटील, संभाजीराजे, पी. डी. पाटील अशा दिग्गज नेत्यांची गळती लागली तरीही नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला नसल्याने जिल्हा परिषदेची सत्ता गेली.
हातकणंगले, करवीर, शिरोळ तालुक्यांवर ज्या पक्षाची पकड त्याच पक्षाकडे जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे ताब्यात राहू शकतात,पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या तालुक्याकडे दुर्लक्ष केले. नेत्यांनी आपले मतदारसंघापलीकडे बघितलेच नाही. ‘सोयीचे राजकारण’ व कचखाऊ भूमिकेमुळे पक्षाला करवीर, दक्षिण मतदारसंघात उमेदवार देता आला नाही. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक, २०१७ होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पाहिल्या तर पाटील यांना आतापासूनच कामाला लागले पाहिजे.
५कागललाच झुकते माप!
जिथे पक्ष सक्षम आहे, तिथेच नेत्यांनी पदांचे वाटप करताना झुकते माप दिले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कागल तालुका अर्धा येतो, तरीही ‘अशासकीय सदस्य’ नियुक्तीत तब्बल तिघांना, तर सर्वांत मोठा असणाऱ्या करवीर तालुक्यातील एकालाच संधी दिली. असे प्रत्येक ठिकाणी नेत्यांनी ‘सोयीचे राजकारण’ केल्याने पक्षवाढीवर मर्यादा आल्या आहेत.