भुदरगडमध्ये नेत्यांच्या सोईस्कर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:23 AM2019-04-08T00:23:02+5:302019-04-08T00:23:07+5:30

शिवाजी सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गावागावांत निवडणुकीचा ज्वर वाढायला लागला आहे. गाववार प्रचारसभा सुरू ...

The convenient role of leaders in Bhudargarh | भुदरगडमध्ये नेत्यांच्या सोईस्कर भूमिका

भुदरगडमध्ये नेत्यांच्या सोईस्कर भूमिका

googlenewsNext

शिवाजी सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गावागावांत निवडणुकीचा ज्वर वाढायला लागला आहे. गाववार प्रचारसभा सुरू झाल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचाराचे मुद्दे ‘रीचेबल-नॉट रीचेबल’ या पलीकडे गेलेले नाहीत. परंतु रीचेबल मतदार सावध पवित्र्यात आहेत. भुदरगड तालुक्यातील नेते नेमका कुणाचा ‘गेम’ करायचा ? या विचारात असल्याने कही पे निगाहे कहीं पे निशाणा ! या काव्याची अनुभूती या निवडणुकीत येणार आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या मताधिक्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाडिक यांचे मताधिक्य टिकवून ते वाढवण्यासाठी माजी आमदार बजरंग देसाई, के. पी. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
या तालुक्यात काँग्रेस अंतर्गत तीन गट, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे चार प्रमुख गट आहेत. भाजप-शिवसेना युतीचे प्रणेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी संपूर्ण राधानगरी मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली आहे. भाजपचे नेते नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत हे प्रा. मंडलिक यांच्या मताधिक्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. तर त्यांना आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे माजी आमदार दिनकरराव जाधव आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, सचिन घोरपडे ही मंडळी मंडलिक यांना छुपी मदत करण्यासाठी सरसावली आहेत. माजी आमदार जाधव गटातील कार्यकर्त्यांनी आघाडीच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांना या मतदारसंघात गतवेळी ३२४२ इतके मताधिक्य होते. आता त्यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांभाळली आहे. त्यांनी गावागावांत प्रचाराच्या सभा घेण्याचा धडाका लावला आहे. गटांतर्गत नाराजी असूनही केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ही मंडळी काम करीत आहेत. राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य जीवन पाटील यांचे पूर्वांपार महाडिक घराण्याशी जवळीकता आहे. काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई, ‘गोकुळ’चे संचालक धैर्यशील देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून प्रचार यंत्रणा राबवत आहेत. महाडिक कुटुंबियांशी जवळीकता असलेले भाजपचे राहुल देसाई आणि देवराज बारदेस्कर यांची त्यांना मदत होणार आहे. महाडिक युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात आहेत.
भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागात बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई आणि गोकुळचे संचालक विलास कांबळे हे राष्ट्रवादीचे काम करीत आहेत. पण काँग्रेसचे दिनकरराव जाधव गट प्रा. मंडलिक यांच्यासोबत राहण्याचे संकेत आहेत. बिद्रीचे माजी संचालक के. जी. नांदेकर हे मंडलिकांसोबत आहेत. गतवेळीच्या निवडणुकीत या दोन उमेदवारांसोबत हेच नेते होते. मात्र त्यावेळी आमदार प्रकाश आबिटकर हे आमदार नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर ते आमदार झाले आहेत. ही मंडलिक यांची जमेजी बाजू आहे.
तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे पण गट विभागल्यामुळे मतांची विभागणी अटळ आहे. के. पी. पाटील आणि जीवन पाटील यांच्यात सख्य नाही. परंतु ते एकत्र आहेत. भाजपचे दोन नेते खासदार महाडिक यांच्यासोबत तर उर्वरित प्रा. मंडलिक यांच्यासोबत आहेत. शिवसेना आमदार आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. तर दुसऱ्या फळीत काम करणाऱ्या नेत्यांना गोकुळच्या उमेदवारीचे खूळ असल्याने या निवडणुकीत तालुक्यात चांगलीच घुसळण होणार आहे. सध्या मंडलिक यांची हवा असली तरी ही हवा मतदानात परावर्तित होईपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी ताकदीने काम करावे लागेल. तर आमदार महाडिक यांनी अंतर्गत जोडण्या लावण्याचा सपाटा लावला आहे. भाजप कार्यप्रणालीमुळे कर्जमाफी, नोटबंदी, जीएसटी आणि आॅनलाईन या घटनांची मतदारांच्या मनात सुप्त चीड आहे.

Web Title: The convenient role of leaders in Bhudargarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.