Kolhapur News: गोविंद पानसरे हत्या प्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती, सुनावणीला वेग येणार; पुढील सुनावणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:52 PM2023-01-09T17:52:06+5:302023-01-09T18:18:44+5:30

समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश

Conviction of 10 suspects including Sameer Gaikwad, Virender Singh Tawde in conspiracy and murder case of Comrade Govind Pansare | Kolhapur News: गोविंद पानसरे हत्या प्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती, सुनावणीला वेग येणार; पुढील सुनावणी..

Kolhapur News: गोविंद पानसरे हत्या प्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती, सुनावणीला वेग येणार; पुढील सुनावणी..

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट आणि खून केल्याप्रकरणी कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी (दि. ९) दहा संशयितांवर दोषनिश्चिती करण्यात आली. त्यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे पानसरे खून खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.

अटकेतील दहा संशयितांपैकी सहा संशयित बंगळुरू येथील कारागृहात होते, तर तीन संशयित पुण्यातील येरवडा कारागृहात होते. पोलिस बंदोबस्तात संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले. समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. पानसरे यांचा खून झाल्यानंतर एसआयटीने तपास करून १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, एटीएसकडूनही तपास सुरू आहे. 

दरम्यान, गुन्ह्यातील दहा संशयितांवर सोमवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषनिश्चिती करण्यात आली. न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपांबद्दल विचारणा केली. मात्र, सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केले. पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. संशयितांवर दोषनिश्चिती झाल्यामुळे खटल्याच्या कामकाजाला गती येईल, असा विश्वासही ॲड. राणे यांनी व्यक्त केला.

आरोप नाकबूल

न्यायाधीशांनी आरोपांबद्दल विचारणा करताच सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केला. सुनावणीच्या सुरुवातीला संशयितांचे वकील समीर पटवर्धन उपस्थित नव्हते. त्यामुळे काही संशयितांनी वकिलांशी चर्चा करून दोषनिश्चितीच्या कागदांवर सही करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. २० मिनिटांनी ॲड. पटवर्धन आल्यानंतर त्यांच्याशी संशयितांची चर्चा झाली. त्यानंतर संशयितांनी दोषनिश्चितीच्या कागदावर सह्या केल्या.

दहा संशयित हजर

समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय ४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (वय ३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. संभाजीगल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (वय ३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. दौलताबाद,औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (वय ३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय २९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (वय ३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते.

संशयितांची रवानगी कळंबा कारागृहात

बंगळुरू येथून आणलेल्या संशयितांना पुन्हा सोडण्यासाठी रात्रीचा प्रवास करणे साेयीचे नाही, त्यामुळे सोमवारी रात्री संशयितांना कळंबा कारागृहात ठेवण्याची परवानगी विशेष सरकारी वकील राणे यांनी कोर्टाकडे मागितली. सीपीआरमधील वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

Web Title: Conviction of 10 suspects including Sameer Gaikwad, Virender Singh Tawde in conspiracy and murder case of Comrade Govind Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.