शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणीवर, कारण काय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:00 PM2023-02-14T16:00:02+5:302023-02-14T16:00:51+5:30

कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे अगोदरच हा सोहळा वादग्रस्त बनला होता

Convocation ceremony of Shivaji University postponed | शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणीवर, कारण काय? वाचा

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणीवर, कारण काय? वाचा

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा गुरुवारी (दि. १६) होणारा ५९वा दीक्षांत समारंभ प्रशासनाने सोमवारी लांबणीवर टाकला. काही अपरिहार्य कारणांमुळे हा समारंभ लांबणीवर टाकण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कुलपतींच्या अध्यक्षतेखाली हा दीक्षांत समारंभ होणार नाही. नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होऊन ते कुलपती पदावर आरूढ होत नाहीत, तोपर्यंत हा समारंभही लांबणीवर पडला आहे.

दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल अँड रिलेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे अगोदरच हा सोहळा वादग्रस्त बनला होता. त्यांनी राजीनामा दिल्याने वाद आपोआपच संपुष्टात आला. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी हा समारंभ नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर होईल असे निवेदन सोमवारी प्रसिद्धीस दिले. समारंभाची नवीन तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विद्यापीठात मंडपाचे काम पूर्ण

या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने जय्यत तयारी केली होती. ६६ हजार ४५७ पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण झाली आहे. विद्यापीठ परिसराची स्वच्छता आणि रस्ता डागडुजी तसेच सुशोभीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठविणे, त्यांची बैठक व्यवस्था, ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडीचे नियोजन, समारंभाचे सभागृह, मुख्य इमारतीसमोरील परिसराची स्वच्छता ही कामे सोमवारीही सुरू होती.

Web Title: Convocation ceremony of Shivaji University postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.