अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात येणार कूल कोट, उन्हाच्या चटक्यापासून भाविकांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:32 PM2023-05-04T12:32:19+5:302023-05-04T12:33:26+5:30
येता ७ ते ८ दिवसांमध्ये काम पूर्ण केले जाणार
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या बाहेरील परिसरात क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने कूल कोट लावण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ देवस्थान समितीचे अधिकारी आणि क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.
अंबाबाई मंदिराकडे जाताना भाविकांना भरउन्हामुळे पायाला चटके बसत होते. त्यांचा हा त्रास वाचावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या परिसरात कूल कोट बसवण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात देवस्थान समितीने निविदा काढली होती. मात्र, कोल्हापूरमधील क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने सामाजिक दातृत्वातून हा कूल कोट बसवून देण्यासाठी पुढाकार घेतला. कूल कोट लावल्याने भाविकांना ऐन उन्हाळ्यात पायाला चटके बसण्यापासून दिलासा मिळणार आहे.
हे काम येता ७ ते ८ दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. यावेळी क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे आर. के. पाटील, पाॅप्युलर भूमी ग्रुपचे रणजित जाधव, स्मॅक आयटीआय अध्यक्ष राजू पाटील , गोशिमाचे माजी अध्यक्ष सुरजित पवार, अभिजित जाधव, नितीन सासणे, डॉ. भरत कोटकर, विक्रांत पवार, प्रसाद पाटील, किशोर कदम, शैलेश शिंदे, जयदीप जाधव, उमेश पवार, सनी घोरपडे, उमेश साळोखे, सुयेश पाटील उपस्थित होते.