थंड कोल्हापूरचा पारा चढला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:57 AM2018-04-25T00:57:01+5:302018-04-25T00:57:01+5:30
कोल्हापूर : चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, जैवविविधता आणि वृक्षांची हिरवी दुलई या वैशिष्ट्यांमुळे एकेकाळी थंड असलेल्या कोल्हापूरचा पारा गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलाच वाढला आहे. रस्ते रुंदीकरण आणि सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी झाडांचीच समिधा दिली गेली आणि आता उन्हाच्या तीव्र झळा सोसताना यंदा ऊन किती वाढलंय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूरला लाभलेल्या निसर्गाच्या वरदानामुळे या शहराला कधी तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत उन्हाळ््याच्या चार महिन्यांतही कोल्हापूरचा पारा कधी ३५ ते ३६ डिग्री सेल्सिअसवर गेला नाही. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींच्या तोंडून ‘कोल्हापूर किती थंड आहे’, हे वाक्य हमखास ऐकायला मिळायचे. मात्र, कोल्हापूरचा रस्ते रुंदीकरणाचा प्रकल्प जणू या थंड कोल्हापूरच्या मुळावर उठला.
तेव्हापासून या शहराचा पारा वर्षागणिक दोन-तीन डिग्री सेल्सिअसने वाढू लागला. यंदा या उन्हाने एप्रिल महिन्यातच ४१ ते ४२ डिग्री सेल्सिअसचा टप्पा गाठला
आहे. आताच अशी स्थिती आहे, तर
मे महिन्यात कसे होणार, या विचारानेही पुन्हा पारा चढण्याची वेळ आली आहे.
तापमानवाढीच्या चर्चेत ग्लोबल वॉर्मिंगचा नेहमी उल्लेख होतो. मात्र, प्रादेशिक आणि स्थानिक वातावरणाचा फार मोठा परिणाम सर्व ऋतूंवर होतो. कोल्हापूर शहरातील रस्त्यालगतची दोन हजार झाडे रस्ते रुंदीकरणात कापली गेली. त्याच्या दुप्पट वृक्ष लावून ते जगवण्यात स्थानिक प्रशासन आणि नागरिकही कमी पडले. अजूनही अनेक कारणांनी सर्रास झाडं तोडली जातात. तुलनेने उपनगरांत अजूनही झाडे असल्याने राहणाºया नागरिकांना किमान परिसरात तरी फार उकाडा जाणवत नाही.
गेल्या काही वर्षांत जुन्या कोल्हापूरची वाटचाल मुंबई-पुण्यासारख्या सिमेंटच्या जंगलांच्या दिशेने सुरू झाली आहे. परिसरातील लहान-मोठ्या डोंगरांवरील झाडे गेली, परिसराचे सपाटीकरण झाले आणि उंचच उंच इमारती तयार झाल्या. याचाही फार मोठा परिणाम तापमानवाढीमध्ये झाला आहे. साडेदहा-अकरा वाजताही घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने दुपारी बारा ते दुपारी चार या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.
झाडं लावू नका, जगवा
कोल्हापूरच्या या वातावरण बदलाबाबत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत म्हणाले, तापमानवाढीला स्थानिक नागरिक म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार आहोत. झाडे उन्हाची तीव्रता कमी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीने आणि सिमेंटच्या इमारतींमुळे ही वेळ आली आहे. उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर झाडं नुसती लावू नका तर जगवा. प्रत्येकाने किमान आपल्या दारात दोन झाडे लावून ती जगवली तरी खूप आहे.