लाचखोरीत ‘सहकार’ आघाडीवर, अवघ्या १७ प्रकरणांत घेतली ७३ लाखांची लाच

By उद्धव गोडसे | Published: November 10, 2023 04:52 PM2023-11-10T16:52:02+5:302023-11-10T16:52:19+5:30

लाचखोरीतील टॉपचे जिल्हे कोणते.. वाचा

Cooperation and marketing department is in the forefront in accepting huge sums of money in bribery | लाचखोरीत ‘सहकार’ आघाडीवर, अवघ्या १७ प्रकरणांत घेतली ७३ लाखांची लाच

लाचखोरीत ‘सहकार’ आघाडीवर, अवघ्या १७ प्रकरणांत घेतली ७३ लाखांची लाच

उद्धव गोडसे

कोल्हापूर : लाचखोरीत महसूल आणि पोलिस विभाग बदनाम असले तरी, लाचेची मोठी रक्कम स्वीकारण्यात मात्र सहकार व पणन विभागाने आघाडी घेतली आहे. गेल्या दहा महिन्यांत या विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ कारवाया केल्या असून, २१ लाचखोरांना पकडले. त्यांनी ७३ लाख ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मी लाच घेणार नाही, अशी शपथ घेऊनही लाच घेणारे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाच घेणारे महसूल आणि पोलिस विभागातील कर्मचारी अनेकदा सापडतात. त्यानंतर वीजवितरण, शिक्षण, महापालिका, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, औद्योगिक विकास महामंडळाचा नंबर लागतो. सहकार व पणन विभागात कारवायांची संख्या कमी असली तरी, लाचेची रक्कम मोठी असल्याने हा विभाग पैसे खाण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्यात गेल्या १० महिन्यांत या विभागात केवळ १७ कारवाया झाल्या. यातील २१ संशयितांनी ७३ लाख ३८ हजारांची लाच स्वीकारली. लाचखोरांमध्ये वर्ग एकच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दहा महिन्यांत ६८६ कारवाया

राज्यात गेल्या दहा महिन्यांत ६८६ कारवायांमध्ये ९५२ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात सापडले. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी दहा महिन्यांत ६१० कारवाया झाल्या होत्या.

परिक्षेत्रातील कारवाया

  • नाशिक - १३७
  • पुणे - १२४
  • छत्रपती संभाजीनगर - ११२
  • ठाणे - ९१
  • अमरावती - ७०
  • नागपूर - ६९
  • नांदेड - ५३
  • मुंबई - ३०


लाचखोरीतील टॉपचे जिल्हे

  • नाशिक - ५३
  • पुणे - ५२
  • छत्रपती संभाजीनगर - ४३
  • ठाणे - ४७
  • अहमदनगर - २९


प्रमुख विभागांची लाचखोरी

विभाग - कारवाया - लाचखोर - रक्कम
महसूल - १७७ - २३४ - ४२ लाख ५० हजार ६९०
पोलिस - १२४ - १६५ - ३७ लाख ३१ हजार ८००
वीजवितरण - ३७ - ५२ - ७ लाख १७ हजार ८००
शिक्षण - ३१ - ५० - २४ लाख ५९ हजार २१५
महापालिका - ३२ - ४५ - २५ लाख ६२ हजार ४००
सहकार व पणन - १७ - २१ - ७३ लाख ३८ हजार १००
जलसंपदा - ११ - १७ - १५ लाख ३१ हजार ६३०
औद्योगिक विकास महामंडळ - ३ - ४ - २५ लाख २५ हजार

शपथ घेऊन लाचेची मागणी

राज्यात ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच घेणार नसल्याची शपथ घेतात. मात्र, याचा प्रभाव फार काळ टिकत नसल्याचे दिसत आहे.

महसूल आणि पोलिस विभागात कारवायांची संख्या जास्त असली तरी लाचेची रक्कम कमी आहे. त्या तुलनेत सहकार व पणन, वीजवितरण, महापालिका, जलसंपदा विभागातील लाचखोरांकडून मोठ्या रकमा स्वीकारल्या जात आहेत. -सरदार नाळे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: Cooperation and marketing department is in the forefront in accepting huge sums of money in bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.