संचालकांसाठी नव्हे, शेतकरी- कामगारांसाठीच गडहिंग्लज कारखान्याला सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:05+5:302021-06-27T04:17:05+5:30
गडहिंग्लज : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ...
गडहिंग्लज : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले.
गडहिंग्लज येथे पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना
आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गडहिंग्लज कारखाना, गडहिंग्लज अर्बन बॅंक व आंबेओहोळच्या पूर्ततेचा श्रेयवाद या विषयांवरही त्यांनी खास शैलीत टिप्पणी केली.
मुश्रीफ म्हणाले, संचालकांना कंपनी कधी एकदा कारखाना सोडून जाते असे झाले होते. ते अनुभवी आहेतच परंतु, त्यांच्याकडे न पाहता आपल्या मतदारसंघातील कारखाना असल्यामुळे तो चालला पाहिजे, यासाठी शासनाची थकहमी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच जिल्हा बँकेचेदेखील कारखान्याला सहकार्य राहील.
अधिकाराचा गैरफायदा घेवून सरव्यवस्थापकानेच गडहिंग्लज अर्बन बँकेत अपहार केला त्यामुळे बँकेची बदनामी झाली. तालुक्यातील एक चांगली बँक म्हणून बँकेची ओळख आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सर्वप्रकारची मदत बँकेला केली जाईल,अशी ग्वाही मुश्रीफ यांनी बैठकीत दिली.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, डॉ. चंद्रकांत खोत, डॉ. मल्लिकार्जून अथणी उपस्थित होते.
-
चौकट १) सीमेवर होणार अॅण्टिजन तपासणी !
गडहिंग्लज विभागातील शिनोळी, कानूर आणि गवसे या तीन ठिकाणी तपासणी नाके सुरु करा. इतर राज्यातून येणार्यांना नाक्यांवर अॅण्टिजन तपासणी करूनच प्रवेश द्या, असा आदेश मुश्रीफ यांनी दिला.
२) सासर - माहेर दोन्ही सारखंच ! आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण झाले आहे. धरणात पाणी साठवले जात आहे. परंतु, काहीजण आपल्यामुळेच धरण झाले, अशा अविर्भावात आहेत. असे श्रेय लाटणे म्हणजे ' येड्या बाईला सासर काय आणि माहेर दोन्ही सारखचं' अशा शब्दांत मुश्रीफ यांनी नामोल्लेख टाळून समरजित घाटगे यांची खिल्ली उडविली.
२६ गडहिंग्लज हसन मुश्रीफ
-
फोटो ओळी-
गडहिंग्लज येथील कोरोना आढावा बैठकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर उपस्थित होते.