राज्यात सहकार भक्कम : देशमुख
By admin | Published: January 2, 2017 12:54 AM2017-01-02T00:54:58+5:302017-01-02T00:54:58+5:30
आजऱ्यात शेतकरी मेळावा : कारखान्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यात एक-दोन अपवाद वगळता राज्यामध्ये सहकार भक्कमपणे रूजला असून, आजरा तालुक्यातील सहकारी संस्था आदर्शवत आहेत. आजरा साखर कारखान्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन सहकार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
आजरा साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळावाप्रसंगी सहकारमंत्री देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग महमंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके होते. सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष वसंतराव देसाई यांच्या पुतळ्याचे पूजन व साखर कारखान्यातून उत्पादित झालेल्या दोन लाखाच्या साखरपोत्यांचे पूजन देशमुख यांनी केले.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, आजरा कारखाना हे तालुक्याच्या विकासाचे केंद्र आहे. ते सक्षमपणे चालविण्यास कटिबद्ध आहोत.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आपणाला सहकार्य लाभत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यासोबत राहून आघाडीच्या सर्व जागांवर विजय मिळवू. तालुक्यातील अंतिम टप्प्यात असलेले पाणी प्रकल्प मार्गी लावणे व डिस्टीलरी प्रकल्प उभा करण्यासाठी सहकारमंत्र्यांनी मदतीचा हात पुढे करावा, असेही स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले, सद्य:स्थितीत साखर उद्योग अडचणीत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनाचा सहकार हा गाभा आहे. चुकीच्या पद्धतीने संस्था चालविणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे. पण, त्याचवेळी आजऱ्यासारख्या डोंगराळ तालुक्यातील चांगल्या पद्धतीने कारखाना चालविणाऱ्यांचे कौतुकही झाले पाहिजे. ‘आजरा’च्या पाठीशी आपण कायम राहू, असेही स्पष्ट केले.
यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांना सोबत घेवून परिवर्तनाची लाट कायम ठेवा, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. माजी आमदार संजय घाटगे, हिंदूराव शेळके यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात कंपोस्ट खत वाटप, प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप व अंशुमाला पाटील ट्रस्टतर्फे महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अनिल देशपांडे, रवींद्र आपटे, उपाध्यक्ष सुनिता रेडेकर, संग्रामसिंह कुपेकर, अजित चराटी, विजय देवणे, अंशुमाला पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, कारखान्याचे सभासद, कर्मचारी, महिला उपस्थित होत्या. कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चराटी म्हणतात : भाजपात नाही..पण सोबत
तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, भाजप, स्वाभिमानी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपली वाटचाल सुरू आहे. मी कोणत्या पक्षात आहे हे माझे मला माहीत नाही. मी भाजपात नसलो तरी भाजपासोबत आहोत, असा जाहीर खुलासा चराटी यांनी केला.