केंद्राच्या पॅकेजबाबत सहकारमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी : हसन मुश्रीफ
By admin | Published: June 12, 2015 11:08 PM2015-06-12T23:08:52+5:302015-06-13T00:13:39+5:30
राज्य बॅँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यांनी स्वत:च्या ताकदीवर बॅँकांकडून कर्ज उपलब्ध करून घ्यायचे आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सहा कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण त्याबरोबर सहाशे कोटी व्याजाची तरतूदही केल्याने कारखान्यांना बॅँकांकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. सध्या कारखान्यांची अवस्था पाहिली तर ते अशक्य असल्याने सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पॅकेजबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी करीत दोन हजार कोटी पॅकेजचे आश्वासन राज्य सरकारला पाळावेच लागेल, असेही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सरकारला सुनावले. ते म्हणाले, केंद्राने पॅकेजची घोषणा करून कारखानदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा; पण याबाबतची स्पष्टता सरकारच्या पातळीवर केली जात नाही. राज्य बॅँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यांनी स्वत:च्या ताकदीवर बॅँकांकडून कर्ज उपलब्ध करून घ्यायचे आहे. त्याचे व्याज केंद्र सरकार देणार आहे. यासाठीच केंद्राने पॅकेजच्या घोषणा करताना सहाशे कोटी व्याजाची तरतूद केली आहे; पण सर्वच कारखाने आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे बॅँका तारणाशिवाय कर्ज देणार नाहीत. साखरेवरील कर्जाची मर्यादा संपल्याने राज्य सहकारी बॅँक वाढीव कर्ज देणार नाही, असे त्रांगडे तयार होणार असल्याने केंद्र सरकार कशा पद्धतीने कारखान्यांना पॅकेज देणार, याबाबत सहकारमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी. त्यातच केंद्राने पॅकेज दिल्याने राज्य सरकार आता देणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे; पण त्यांना तसे करता येणार नाही.