समन्वयातून शहराचा विकास साधणार
By Admin | Published: April 6, 2017 12:51 AM2017-04-06T00:51:26+5:302017-04-06T00:51:26+5:30
अभिजित चौधरी : महापालिका पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांना दिली ग्वाही
कोल्हापूर : प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराचा विकास करण्याची ग्वाही आयुक्त अभिजित चौधरी यांनी बुधवारी महानगरपालिका पदाधिकारी व नगरसेवकांना दिली. यावेळी आयुक्त चौधरी यांनी नगरसेवकांच्या अपेक्षा आणि सूचना ऐकून घेतल्या.
महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी बुधवारी दुपारी आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महानगरपालिकेची नवीन इमारत बांधणे, रखडलेले बीओटी प्रकल्प पूर्णत्वास नेणे, बीओटी प्रकल्पास प्रतिसाद मिळत नसेल तर प्रकल्प महापालिकेने स्वत: विकसित करून उत्पन्न मिळविणे, उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत निर्माण करणे, महिला नगरसेविकांचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील कामांना प्राध्यान्य देणे, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोणताही नवीन कर बसवायचा असल्यास प्रथम कोल्हापुरात राबविला जातो. नागरिकही असा कर भरणारे आहेत. याकरिता शहरातील नवीन मिळकतींचा शोध घ्यावा यातून घरफाळ्याच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली. उपमहापौर अर्जुन माने, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक जयंत पाटील, महेश सावंत, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण, सभागृहनेता प्रवीण केसरकर, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, गटनेता सुनील पाटील, नगरसेवक सुभाष बुचडे, संदीप कवाळे, श्रावण फडतारे, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, नगरसेविका नीलोफर आजरेकर, शमा मुल्ला, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. बदली होऊन गेलेले पी. शिवशंकर यांचे आणि विद्यमान पदाधिकारी व नगरसेवक यांच्यात नेहमी खटके उडत राहिल्यामुळे प्रशासनात शिथिलता आली होती. विकासकामांना खीळ बसली होती. अधिकारीही दबावाखाली होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)