कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी कर्नाटकसोबत समन्वय ठेवा, विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:37 PM2024-05-18T12:37:20+5:302024-05-18T12:37:45+5:30
मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सूचना
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने आंतरराज्यीय समन्वय राखावा. पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, पाण्याचा विसर्ग वाढविण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना द्यावी. धरणभिंती, कालवे संरचनांची तपासणी करून कुठे गळती असल्यास दुरुस्ती करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्या.
विधानभवन येथे आयोजित पुणे विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
पुलकुंडवार म्हणाले, यावर्षी हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे आपत्काळात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. सर्व विभागांनी आपले नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावेत. पूरप्रवण व दरडग्रस्त क्षेत्रात स्थानिक यंत्रणांनी विशेष खबरदारी घ्यावी, धोकादायक पुलांचे संरचनात्मक अंकेक्षण करावे, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव पाठवावेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.
पोहणाऱ्यांची यादी तयार..
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस विभागाच्या तयारीची माहिती दिली. सर्व जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरू शकतील अशा पोहणाऱ्या व्यक्तींची यादी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल, ग्रामविकास आणि पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीतील महत्त्वाच्या सूचना
- पशूंचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या.
- मृत पशूंच्या योग्य विल्हेवाटीची व्यवस्था करावी.
-आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामग्री, पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवा.
- धोकादायक वाड्यांतील नागरिकांचे स्थलांतर करा.
- नाले, नदीपात्राच्या कडेची अतिक्रमणे काढून या नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित करा.
- महावितरणने विजेचे खांब, तारा यांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी.