दादांचं कोरं पाकीट आणि मुश्रीफांचा अभिमन्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2017 12:38 AM2017-01-01T00:38:48+5:302017-01-01T00:38:48+5:30
( ३१ डिसेंबरच्या न झालेल्या पार्टीचा हा वृत्तांत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.)
सोमवार, दि. २६ डिसेंबर २0१६
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपली आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादांची ‘गळा’भेट घेतली. ‘दादा, दादा, काम आहे.’ दादा म्हणाले, ‘बोला...लवकर,’ ‘काही नाही... ३१ डिसेंबरला रात्री तुम्हाला वेळ काढायला लागतोय.’ दादा म्हणाले, ‘मी त्यात नसतो.’ मिणचेकर म्हणाले, ‘तसं नव्हे, त्या दिवशी रात्री तुम्ही, तीनही खासदार आणि सगळ्या आमदारांचं एक काव्यसंमेलन व्हावं, अशी इच्छा आहे. बाकी काही नाही. कार्यक्रम झाल्यावर शाकाहारी जेवण!’ दादांना ही नावीन्यपूर्ण कल्पना आवडली. म्हणाले, ‘ठीक आहे. राहुल, डायरीत नोंदवा आणि कार्यक्रम नक्की झाला.
शनिवार, दि. ३१ डिसेंबर २0१६
शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी उभारलेल्या खुल्या सभागृहातील संध्याकाळ. कार्यक्रमाची तयारी झालेली. केवळ दादा, तीन खासदार आणि ११ आमदार यांच्यासाठीच हा कार्यक्रम असल्यानं फारशी गर्दी नव्हती. दादा शक्यतो वेळ पाळतात. त्यामुळं सर्वजण आधीच हजर झालेले. सुरुवातीला एकमेकांची ख्यालीखुशाली झाली. चहापाणी झालं. एवढ्यात कोपऱ्यातून ‘ढ्यॅँव ढ्यॅँव ढ्यॅँव ढ्यॅँव ढ्यॅँव’ असा आवाज आला. सगळेजण बघू लागले, तर संयोजक असलेल्या मिणचेकर यांनी थेट गाण्यालाच सुरुवात केली होती. ते जीन पॅँट आणि टी-शर्टवर होते. ‘मुझे पहचानो’ म्हणत त्यांनी ‘मैं हूॅँ डॉन, मैं हूॅँ डॉन’चा ठेका धरला आणि मैफलीत रंग भरायला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे दादांजवळ बसले होते. दादांनी मग ‘राजे, तुम्ही सुरुवात करा’ म्हणून सांगितले. ‘अहो, मी गड-किल्ले फिरणारा. कविता केल्या नाहीत.’ पण, आग्रह झाला आणि सादरीकरण सुरू झाले.
देवेंद्र यांनी रचला पाया
मोदींनी चढवला कळस
राष्ट्रपतींची झाली शिफारस
आणि उघडले संसदद्वार खास
राजेंच्या या रचनेला दाद मिळाली आणि लगेच महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय झाला आणि संध्यातार्इंना गाण्याचा आग्रह झाला. त्यांनी डोक्यावरचा पदर ठाकठीक केला. त्या म्हणाल्या, ‘गाणं नाही; पण चारोळी म्हणते.’ बाबांच्यामुळे माझ्या तोंडी,
विकासाची भाषा
गडहिंग्लज-चंदगडसाठी
नंदा माझी आशा
नेमक्या शब्दांत कुपेकर वहिनींनी सादरीकरण केल्यानं टाळ्या पडल्या. आता युवकांना प्राधान्य द्यायचं ठरलं. मग प्रकाश आबिटकरना आग्रह झाला. दादांसमोरच ते बसलेले. दादा उत्सुकतेनं त्यांच्याकडे पाहत होते. आबिटकर म्हणाले, यांनी केली, त्यांनी केली सगळ्यांनीच मदत केली या सगळ्यांना निधी देतानामाझी मात्र गोची झाली
यावर मुश्रीफ खो-खो हसायला लागले. तेवढ्यात आबिटकरांनी ‘दादा, रस्त्याचं तेवढं बघा,’ हे सांगून घेतलं. दादा म्हणाले, ‘आता नंबर कागलचा.’ मग मुश्रीफ सावरून बसले. त्यांनी मांडी हलवतच आपली चारोळी सुरू केली. अभिमन्यू माझा व्हावा ही अनेकांची इच्छा असे मात्र, चक्रव्यूह भेदण्यासाठीजनशक्ती माझ्याकडे असे
टाळ्या पडल्या. ‘शीशों के घर में रहनेवाले दूसरोंपर पत्थर फेका नहीं करते,’ असा डायलॉग मारून मुश्रीफ खाली बसले. मात्र, तो कुणासाठी होता, हे काही शेवटपर्यंत कळले नाही. एवढ्यात कार्यक्रमस्थळी एकीकडून ५५७७ फॉर्च्युनर, तर दुसरीकडून ९५९९ टाटा स्ट्रॉर्म गाड्या येऊन थडकल्या. एकातून खासदार धनंजय महाडिक, तर दुसरीतून आमदार सतेज पाटील उतरले. नमस्कार-चमत्कार झाले. दादांनी बंटींना खूण केली. बंटी उठले. ते बघत होते दादांकडे; पण निशाणा दुसरीकडे होता. बंटींनी सुरुवात केली.
एकदा पडलो, तरीही उठलो
तशी हार मानणार नाही
डिलिट केलीत काही नावं
पुन्हा त्यांच्याशी संगत नाही....
एवढं म्हणून होतंय एवढ्यात मुन्नांनी डायरेक्ट चारोळी सुरूच केली.
टॉप थ्री खासदार
ही तर एक झलक आहे
हा तर फक्त ट्रेलर
खरा पिक्चर बाकी आहे...
आता काहींना वाटलं, बहुतेक इथं राडा होतोय; पण सर्वांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि वातावरण निवळलं. तोपर्यंत सदाभाऊ खोतांना फोन लागत नाही म्हणून त्रासलेल्या राजू शेट्टींना आग्रह झाला. ते म्हणाले, ‘कविता कसल्या करताय, दराचं बघा.’ पण दादा म्हणाले, ‘आज काही कारण काढायचं नाही.... पर्याय नाही म्हटल्यावर भाषणाच्या टोनमध्येच चारोळी सुरू केली.
झाली असली जरी कोंडी तरी
दांडक्यानं एकेकाला
फोडून काढीन
शेतकऱ्यांच्या पैशांसाठी
भाऊंचा दिवा पणाला लावीन.
दादा गालातल्या गालात हसत होते. तोपर्यंत तिकडे राजेश क्षीरसागर काहीतरी अंगात घालत होते. अधिक विचारेपर्यंत त्यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार व्हावास, या मागणीचं निवेदन लिहिलेला अंगरखारूपी फलकच अंगात चढविला. तोपर्यंत दादांचं लक्ष घड्याळाकडं गेलं. ‘अहो, उशीर होतोय...’ म्हटल्यावर मग शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील यांना एकत्र संधी देण्याचं ठरलं. कधी नव्हे ते या चौघांनीही ते मान्य केलं आणि पाठ असल्यासारखं ते म्हणू लागले...
शिवसेनेचा भगवा हाती
माथी केशरी टिळा
सेनाप्रमुखांचे पाईक आम्ही
आम्हां मातोश्रीचा लळा
हे व्हायच्या आधीच क्षीरसागरांनी खच्चून ‘छत्रपती शिवाजी महाराज की...’ अशी घोषणा दिली आणि सर्वांनी ‘जय’ म्हणत त्याला प्रतिसाद दिला. क्षीरसागरांचा आवाज आणि घोषणा म्हटल्यावर लांबवर असलेले पोलिस अधिकारीही धावत आले. एवढ्यात हाळवणकर दादांना म्हणाले, ‘दादा, आम्हाला संधी आहे का नाही...?’ दादा म्हणाले, ‘देणार संधी, आता तुमचाच नंबर आहे.’ हाळवणकरांनी सुरुवात केली -
तुमचाच नंबर, तुमचाच नंबर
ऐकून आता कंटाळा आला
देणार असला तर देऊन टाका
दादा, माझ्या कामाचं
काय ते बोला!
हाळवणकरांचा रोख लक्षात आला आणि दादांनी अमल महाडिक यांच्याकडे कटाक्ष टाकला. अमल या सर्व मंडळींमध्ये तरुण आमदार. त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि सुरुवात केली.
नवखा जरी असलो तरी,
मागे डॅडींची ताकद आहे
दादा, तुमचं बोट धरलंय
आता जबाबदारी तुमची आहे.
दादा खुश झाले. आता दादांचा नंबर होता. दादा नेमकी काय रचना सादर करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं. दादांनी डोळे मिटले. हात जोडले आणि सुरुवात केली
हम होंगे कामयाब, हम होेंगे कामयाब
हम होंगे कामयाब, एक दिन... एक दिन
हो हो मन में है विश्वास, मन में है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन.....
सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘दादा भारी, दादा भारी हॉँ...’ अशा कॉम्पिलिमेंट्स. दादा उठायला लागले; पण मुश्रीफ म्हणाले, ‘दादा... हे राष्ट्रभाषेतील झालं. आम्हाला मराठीत काहीतरी ऐकवा...’ दादांना मुश्रीफांचा आग्रह टाळता येईना. दादा म्हणाले,
मी तर एक कोरे पाकीट
शिक्का मारतो पक्ष
कोल्हापूर असो व नागपूर
मी नेहमी संघ दक्ष...
दादांच्या या अफलातून रचनेला दाद दिली गेली. तेवढ्यात भरलं वागं, भाकरी, मडक्यातील दही, पुलाव भरलेली ताटं समोर आली. सर्वांचं हसत-खेळत जेवण झालं आणि एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत मंडळी विद्यापीठाच्या माळावरून बाहेर पडली.
शब्दांकन : समीर देशपांडे
( ३१ डिसेंबरच्या न झालेल्या पार्टीचा हा वृत्तांत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.)