कोरे- शेट्टी दिलजमाई

By Admin | Published: February 4, 2017 12:03 AM2017-02-04T00:03:32+5:302017-02-04T00:03:32+5:30

आमने-सामने बसून चर्चा : जिल्हा परिषदेच्या निमित्ताने वाढली जवळीक

Corey-Shetty Dilajmai | कोरे- शेट्टी दिलजमाई

कोरे- शेट्टी दिलजमाई

googlenewsNext

कोल्हापूर : पारंपरिक विरोधक असलेल्या विनय कोरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निमित्ताने भाजपच्या पुढाकाराने जवळीक निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी सकाळी हॉटेल रेसिडेन्सी येथे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत कोरे आणि शेट्टी यांनी आमनेसामने बसून चर्चा केली. खुद्द कोरे यांनी दोघांनाही एकमेकांच्या भूमिका समजल्या आहेत, असे सांगत ही जवळीक स्पष्ट केली.
गेल्या पंधरा वर्षांत एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीसोबत जाईल तिथे जनसुराज्य सोबत असे. त्यामुळे जिल्हा बॅँकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत अनेक पदे जनसुराज्यला मिळाली.
एवढेच नव्हे, तर कोल्हापूरचा महापौरसुद्धा बनविण्यात कोरे यांना यश आले.
वारणा उद्योगसमूहाचा प्रभाव हा पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांत असल्याने साहजिकच या ठिकाणी राजकीय ताकद वाढविण्याचा कोरे यांनी नेहमीच प्रयत्न केला. राजू आवळे यांच्या रूपाने हातकणंगलेतून ‘जनसुराज्य’ने आमदारकीही कमावली होती; परंतु जेव्हा-जेव्हा लोकसभा आणि साखर हंगामाचा प्रश्न समोर येई, तेव्हा-तेव्हा कोरे शेट्टी यांच्याविरोधात कार्यरत असत.
दरवर्षी हंगाम सुरू करण्यावरून त्यांच्यात आणि ‘स्वाभिमानी’मध्ये संघर्ष ठरलेला असे. वारणा साखर कारखान्याची वाहने अडवून पंक्चर करण्यात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी कधीही कसूर ठेवली नव्हती; परंतु कोरे यांनीही काही वेळा जशास तशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर अनेक वेळा वारणा परिसरात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत होता. त्यामुळे कोरे आणि शेट्टी यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नव्हते.
परंतु, तीन महिन्यांपूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांआधी विनय कोरे यांनी राज्याच्या सत्तेतील सहावा पक्ष म्हणून प्रवेश केल्याने काही संदर्भ बदलायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यातील
एक पाऊल पुढे जात समन्वयासाठी प्रसिद्ध असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे आणि शेट्टी यांना एकत्र आणले. जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानी ‘भाजता’मध्ये सहभागी होणार की नाही, हे स्पष्ट नसले तरी कोरे यांच्या तोंडून शेट्टींसोबतच्या झालेल्या चर्चेबाबत अतिशय सकारात्मक बोल बाहेर पडले आहेत.


शेट्टी आणि माझी भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्य
आम्ही राज्यातील सत्तेत सहावा पक्ष म्हणून सहभागी झालो. नगरपालिकेला कोल्हापूर जिल्ह्यात भाजपसोबत काम केले. त्यात चांगले यश मिळाले. आम्ही सर्वजण एकत्र असताना सोबत असणाऱ्या ‘स्वाभिमानी’शी चर्चा होत नव्हती. मात्र, आज त्याबाबत चर्चा झाली. गावपातळीवर आमच्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे; परंतु व्यापक हित लक्षात घेऊन काही निर्णय घेतले. १४ जागा आम्ही मागितल्या आहेत.

एखाद-दुसऱ्या ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढतही होईल; परंतु शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेट्टी आणि याच शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून माझी अशा दोघांच्याही भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्य होत्या. दोघांच्याही पक्षांची ग्रामीण जनतेशी नाळ जुळली आहे. त्यामुळे देशहितासाठी म्हणून एकत्र काम करण्याच्या प्रक्रियेला चांगली सुरुवात झाली. काहीतरी विधायक घडविण्यासाठी सर्वांची संघटित ताकद वाढवूया, यावर एकमत झाले.

Web Title: Corey-Shetty Dilajmai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.