कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:50 PM2018-07-24T13:50:17+5:302018-07-24T14:05:12+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे नदीतील पाणीपातळी टिकून आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २३ दिवसांपासून पाऊस पडू लागला आहे. या पावसाचा जोर कमी होत असलातरी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना, कण्हेर, तारळी यासह मोठ्या धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच असल्याने शनिवारी धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते.
रविवारी दुपारी बाराला दरवाजे सहा फुटापर्यंत उचलण्यात आले. तर सोमवारी सकाळी ११ ला धरणाचे दरवाजे आणखी एका फुटाने उचलण्यात आले. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे सात फुटांवरुन साडेपाच फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यातून २३६०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
जिल्ह्यातील धोम वगळता इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ८.४७ टीएमसी साठा होता. धरणातून ३४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बलकवडी धरणातही ३.४४ टीएमसी पाणीसाठा असून ९४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तारळीतील साठा ५.८१ टीएमसी असून २१७२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा देवघर धरण परिसरात ८ मिलीमीटर पाऊस झाला असून साठा ९.४८ टीएमसी आहे. वीर धरणात ९.१९ टीएमसी पाणीसाठा असून ६८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम २१ (४८१)
कोयना ३८ (३२९६)
बलकवडी ११ (१७६८)
कण्हेर ०१ (५६५)
उरमोडी ०३ (८४९)
तारळी १२ (१५६४)