कळंबा कारागृहातील १२ बंदिजनांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:39+5:302021-05-13T04:25:39+5:30
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील १२ बंदिजनांना कोरोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला, त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना आपत्कालीन ...
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील १२ बंदिजनांना कोरोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला, त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना आपत्कालीन कारागृहात कोविड केअर केंद्रात विलगीकरण केले आहे. दरम्यान, कळंबा कारागृहातील बंदींची आवक-जावक बंद ठेवली आहे. नवीन दाखल होणार होणाऱ्या न्यायालयीन बंदींची आपत्कालीन कारागृहात रवानगी केली जात आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनाना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. सध्या कळंबा कारागृहात सुमारे २२०० बंदीजन आहेत. त्यासाठी गेल्या चार दिवसांत लक्षणे असणाऱ्या बंदिजनांची कोरोना चाचणी घेतली जात आहेत. गेल्या दोन दिवसात कळंबा कारागृहातील १२ बंदिजनांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांना तातडीने आयटीआयनजीक आपत्कालीन कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. तसेच नवीन दाखल होणाऱ्या बंदी अथवा न्यायालयीन बंदींना कळंबा कारागृहात न ठेवता आपत्कालीन कारागृहात रवानगी केली जात आहे.
२५० न्यायालयीन बंदीचे जामिनासाठी अर्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृहातील बंदींची गर्दी कमी करण्यासाठी २५० न्यायालयीन बंदींना तात्पुरता जामीन मिळावा यासाठी विविध न्यायालयात अर्ज दाखल केले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.
२६४ बंदी पॅरोल रजेवर बाहेर
कळंबा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदिजन असल्याने बंदिजनांची गर्दी कमी करण्यासाठी गेल्या आठवडाभरात २६४ बंदिजनांना पॅरोल रजा मंजूर केल्या. ते बंदिजन पॅरोल रजेवर मुक्त झाले आहेत. या बंदिजनांना अटी, शर्तीवरच पॅरोल रजा मंजूर केली आहे.
कोट...
कारागृहातील कोरोनाची लागण झालेल्या बंदिजनांना आपत्कालीन कारागृहातील कोविड केअर केंद्रात विलगीकरणात ठेवले आहे. तेथे त्यांना योग्य तो आहार व उपचार करून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. - चंद्रमणी इंदूरकर, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर.