कोरोनामुळे व्यवहार आले २५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:55+5:302021-05-22T04:21:55+5:30
जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा परिणाम शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहारांवर झाला आहे. शेती, प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह अन्य व्यवहारांत घट ...
जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा परिणाम शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहारांवर झाला आहे. शेती, प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह अन्य व्यवहारांत घट आली आहे. मार्च महिन्यात १०४७ व्यवहारांची नोंद झाली होती. एप्रिलमध्ये ४१०, तर सध्या मे महिन्यात केवळ ८६ व्यवहारांची नोंद झाली आहे.
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे २३ मार्च ते १५ मे २०२० पर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार बंद होते. त्यानंतर काही व्यवहार सुरू करण्याची मुभा मिळाली होती.
शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात लाखो रुपयांचे व्यवहार होतात. सर्वाधिक महसूल देणारा हा तालुका आहे. संचारबंदीमुळे शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आल्यामुळे परिणामी महसुलावर पाणी सोडावे लागले. गतवर्षी ऑक्टोबरनंतर खऱ्या अर्थाने व्यवहार सुरू झाले होते. खरेदीखत, संमतीपत्र, दत्तकपत्र, बक्षीसपत्र, भाडेपत्र, लिव्ह ॲण्ड लायसेन्स, गहाणखत, वाटणीपत्र यांसह सर्व व्यवहारांचा यामध्ये समावेश होता. त्यामुळे मार्च २०२१ या एका महिन्यात तब्बल १०४७ व्यवहारांची कार्यालयात नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाही ४१० व्यवहार झाले. परिणामी हे व्यवहार ४० टक्क्यांवर आले. सध्या १ ते २० मेअखेर केवळ ८६ व्यवहार झाले आहेत. कोरोना संसर्गाचा फटका खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला बसला आहे. यामुळे त्याचा महसुलावरही परिणाम झाला आहे. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून या कार्यालयात व्यवहार सुरू असल्याची माहिती दुय्यम निबंधक साळुंखे यांनी दिली.