कोरोनानंतर ह्रदयाशी 'गाठ'!, बाधितांच्या रक्तवाहिन्यांत गाठी; जगातील पहिली केस कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:05 PM2022-04-22T13:05:12+5:302022-04-22T13:22:05+5:30
कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला ही गोष्ट खरी असली तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मात्र यापुढेही स्वत:ला जपावे लागणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला ही गोष्ट खरी असली तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मात्र यापुढेही स्वत:ला जपावे लागणार आहे. विशेषत: ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोराेना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या रुग्णांना रक्ताच्या गाठी होण्याचा मोठा धोका आहे. अशा रुग्णांना रक्ताच्या गाठी हाेण्याची जगातील पहिली घटना कोल्हापुरात शोधण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
कोरोनामुळे हृदयांच्या स्नायूंना सूज
रक्तवाहिन्यात गाठी निर्माण झाल्या की हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह आणि हृदयाची पंपिंगची क्षमता कमी होते. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या हृदयाची पंपिंग क्षमता ही ६० ते ६५ टक्के असते. जर पंपिंग क्षमता ३५ टक्क्यापेक्षा कमी आली तर हृदयाच्या स्नायूंना सूज येते.
हार्टअटॅक, रक्तात गाठीचे रुग्ण वाढले
मद्यपान, तंबाखू, गुटखा, धूम्रपान यासारखी व्यसने तसेच अतिमांसाहार करणाऱ्या व्यक्तींना रक्तात गाठी होण्याची शक्यता अधिक असते. परंतु अलीकडील काळात कोरोना झालेल्या रुग्णांमध्येही हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. सर्व प्रकारच्या शुद्ध, अशुद्ध रक्तवाहिन्यात अशा रक्ताच्या गाठी निर्माण होत आहेत. मेंदूत, ह्रदयात, पोटातील वाहिन्यातही त्या झालेल्या आहेत.
कोणी काळजी घ्यावी?
- ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे तसेच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. डी डायमर लेव्हल वाढणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी लागते.
- सर्वसाधारण व्यक्तींची डी डायमर लेव्हलची नॉर्मल व्हॅल्यू ५०० नॅनोग्रॅमच्या आत असते. जर ५०० नॅनोग्रॅमच्या वर गेली तर रक्तात गाठी होण्याचा धोका दहा पटीने अधिक असतो.
काय काळजी घ्यावी?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धाप लागली, छातीत दुखायला लागले तर आपल्या डॉक्टरांना दाखवावे. छातीची पट्टी, हृदयाची सोनोग्राफी करून घ्यावी.
कोरोना विषाणू नवीन होता. उपचार पद्धती निश्चित नव्हती अशा वेळी कोल्हापुरात २७ मार्च २०२० रोजी ४२ वर्षीय कोरोना रुग्णावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. सातव्या दिवशी त्याचा एक हात अचानक काळा पडायला लागला. एन्जीओग्राफी करून रक्तातील गाठ काढली. कोरोना रुग्णांच्या रक्तात गाठी होतात ही जगातील पहिली केस आम्ही शोधली. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन झाले. तेव्हापासून कोरोना झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन देण्यास सुरुवात झाली. - डॉ. अक्षय बाफना, हृदयशस्त्रक्रिया विभाग प्रमुख, सीपीआर रुग्णालय