कोरोनामुळे उमेदवारांना ५० जणांची सभा घेण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:14+5:302020-12-26T04:20:14+5:30
शिरोळ : कोरोनामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बदल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांची दमछाक ...
शिरोळ : कोरोनामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बदल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांची दमछाक सुरू असतानाच निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांना एकावेळी केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार आहे. शिवाय एक चारचाकी वाहन व दोन दुचाकींवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईच्या सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने गावोगावी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांमध्ये निरुत्साह जाणवत होता. तो बाजूला ठेवून आता पॅनेल प्रमुखांकडून बहुमतासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनेक बदल केले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीत सभा घेण्यासाठी ५० जणांची मर्यादा आणण्यात आली आहे. पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. एकाच वेळी केवळ पाच कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करू शकतात. निवडणुकीच्या निमित्ताने मिरवणूक, मेळावा यांबाबत अनेक निकष लावण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम पाळूनच प्रचार करावा लागणार आहे.
कोट - उमेदवारांना केवळ ५० जणांची सभा घेण्याची परवानगी आहे. छाननीपूर्वी आचारसंहितेच्या निकषांबाबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
- शंकर कवितके, आचारसंहिता पथकप्रमुख