कोरोनामुळे लहान मुलांचे लसीकरणही झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:01+5:302021-07-01T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट सगळीकडेच त्रासदायक ठरली आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट सगळीकडेच त्रासदायक ठरली आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या बरोबरीने आशा, आरोग्य सहा्य्यिका, आरोग्यसेविका आणि तालुका नर्सिंग अधिकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोरोनामुळे अन्य जबाबदाऱ्या वाढल्या असतानाही या सर्व कर्मचाऱ्यांनी लहान मुलांच्या नियमित लसीकरणाच्या कामामध्ये मात्र खंड पडू दिलेला नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या दोन महिन्यांत १४ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनामुळे याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.
बाळाच्या जन्मानंतर बीसीजी लस दिली जाते. अपवादात्मक स्थितीमध्ये म्हणजे बाळाचे वजन कमी असेल अशी काही कारणे असतील तर अधिकाधिक वर्षभरात ही लस दिली जाते. वर्षभरातील एकूण उद्दिष्टाच्या १३ टक्के ही लस दोन महिन्यात देण्यात आली आहे.
पेन्टा ३ ही लस टप्प्याटप्प्याने दिली जाते. दीड महिना, अडीच महिने आणि साडेे तीन महिन्याने ही लस दिली जाते. पूर्वी त्रिगुणी लस दिली जात होती, त्यामध्ये आणखी दोन लसींचे घटक वाढवण्यात आले असून म्हणून याला पेन्टा ३ म्हणतात. यासाठी तीन वेळा संबंधित रुग्णालयात जावे लागते. तिसऱ्या लसीकरणावेळी पोलिओ प्रतिबंधक डोस दिला जातो. जिल्ह्यात १४ टक्के लहान मुलामुलींचे हे लसीकरण झाले आहे. बाळाच्या दहाव्या महिन्यात गोवर रूबेलाचा डोस दिला जातो. ही १२ व्या महिन्यापर्यंत घेता येते. दोन महिन्यात १४ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे.
चौकट
कोरोनाचा परिणाम झालाच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या लसीकरणावर परिणाम झाला आहे. परंतू काम थांबलेले नाही. परंतु ज्या ठिकाणी लसीकरण केले जाते तो जर कन्टेन्मेंट झोन असेल तर मात्र तेथील लसीकरण १४ दिवस थांबवण्यात येते. कोरोनाच्या कामात सर्वजण अडकल्यामुळेही या कामावर थोडा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
कोट
कोरोनाशी लढाई सुरू असली तरी बालकांचे लसीकरण थांबवण्यात आलेले नाही. स्थानिक कोरोना स्थिती लक्षात घेवून काही ठिकाणी रुग्ण वाढल्याने १४ दिवसांसाठी थांबवले असेल. परंतू हे सर्व लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नागरिक, ग्रामस्थांनी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी बालकांना लसीकरण करून घ्यावे.
डॉ. फारूक देसाई
माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
चौकट
जिल्ह्यातील आकडेवारी
बीसीजी लसीकरण १३ टक्के
पेन्टा ३ लसीकरण १४ टक्के
गोवर रूबेला लसीकरण १४ टक्के