corona virus -‘कोरोना’मुळे चित्रपट महामंडळाचेही चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:13 PM2020-03-17T15:13:47+5:302020-03-17T15:16:27+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याच्या निर्णयापाठोपाठ आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही सोमवारी चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे.

Corona also urges the film corporation to stop filming | corona virus -‘कोरोना’मुळे चित्रपट महामंडळाचेही चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन

corona virus -‘कोरोना’मुळे चित्रपट महामंडळाचेही चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरातील मालिका, चित्रपटाला फटका वैद्यकीय पथकाकडून दीडशेजणांची सेटवर तपासणी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याच्या निर्णयापाठोपाठ आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही सोमवारी चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण बंद होणार आहे. याचा फटका कोल्हापुरात सुरू असलेल्या छोट्या पडद्यावरील दोन मालिकांना आणि एका मराठी चित्रपटालाही बसला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून संघटनांनी मालिका, सिनेमांचे चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

पाठोपाठ सोमवारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खबरदारी म्हणून मालिका, चित्रपट, लघुपट आणि माहितीपटाचे चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूरजवळ सध्या दोन मालिका आणि एका मराठी सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेचे चित्रीकरण सध्या केर्ली येथे सुरू आहे. गेली चार वर्षांपासून या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यात सुरू आहे. याशिवाय मोरेवाडी येथील कोल्हापूर चित्रनगरीमध्ये प्रेमाचा गेम, सेम टू सेम या मालिकेचे चित्रीकरण डिसेंबर २०१९ पासून सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या मालिकांचे शिल्लक राहिलेले चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर पॅकअप करण्यात येणार असल्याची माहिती प्रॉडक्शन हेड रवी गावडे यांनी दिली आहे.

मराठी चित्रपटाचे चित्रीकरणही स्थगित

मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरील मराठी चित्रपटाचे गगनबावडा तालुक्यातील पळसंबे येथे चित्रीकरण सुरू आहे. ते स्थगित होणार आहे.

मालिकेच्या सेटवर वैद्यकीय तपासणी

कोल्हापुरात सुरू असलेल्या दोन लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुमारे दीडशेहून अधिक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांची सोमवारी सेटवरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मालिकेच्या निर्मात्या स्मृती सुशीलकुमार शिंदे यांनी सूचना दिल्यामुळे खासगी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली. यामध्ये संबंधितांची रक्त तपासणी, तापमान, हृदयरोग तपासणी करण्यात आली.


रोज मोठ्या प्रमाणात लोक एका ठिकाणी गर्दीत काम करीत असतात; तेथे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, म्हणून या मालिकेचे आणि सिनेमाचे चित्रीकरण थांबवावे, यासाठी सक्ती नाही, परंतु आपल्यामुळे दुसऱ्यांना उपद्रव होऊ नये, याची काळजी घ्यावी आणि शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.
मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ
 

 

Web Title: Corona also urges the film corporation to stop filming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.