corona in belgaon : बेळगावात कोरोना बाधित महिलेचा पती, भाऊ, वाहनचालकांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:48 PM2020-05-14T17:48:37+5:302020-05-14T17:50:18+5:30
मुंबईहून बेळगावात बेकायदेशीर रित्या प्रवेश केलेल्या तिघांवर ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.
प्रशासन आक्रमक- बेळगावात पोजिटिव्ह महिलेच्या पती, भाऊ व कारचालकावर गुन्हा दाखल
बेळगाव : मुंबईहून बेळगावात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या तिघांवर ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.
कोरोनाची बाधा झालेल्या पी 974 या 27 वर्षीय सदाशिवनगर बेळगाव येथील महिलेचा पती, भाऊ, वाहनचालक या तिघांच्यावर मनपा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी अपेडेंमिक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आय पी सी कलम 269,270,188,201,202 आणि आर/डब्ल्यू 34नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदाशिवनगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीत कोरोनाने प्रवेश केल्याने त्या भागात वास्तव्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या घराजवळच कोरोना बाधित महिलेचे घर आहे.
गेल्या 3 मे रोजी ई पास नसल्याने त्यांना कोगनोळी चेक पोस्ट वर थांबवण्यात आले होते. काही तास ती महिलाही तेथे थांबली होती, नंतर त्यांनी चेक पोस्टवरील अधिकाऱ्यांना विनवण्या करून बेळगावला जाण्याची परवानगी घेतली होती.
बेळगावला गेल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार असेही बजवण्यात आले होते, पण बेळगावात आल्यावर ती गर्भवती महिला आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी क्वारंटाइनचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते.
ही महिला आपल्या अन्य कुटुंबातील सदस्यासोबत घरी बंदिस्त रहाणे अपेक्षित होते, पण ही महिला सकाळच्या वेळी आपल्या वडिलांच्या सोबत मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी ओळखीच्या व्यक्तीं बरोबर रस्त्यावर थांबून वार्तालाप होत होता. त्या महिलेचे वडील आणि भाऊ त्यांच्या संपर्कात अनेक लोक अलीकडच्या काळात आले आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहे.
आरोग्य खाते आणि जिल्हा प्रशासनाने या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे तर त्यांच्या घरी येऊन कोण कोण भेटून गेलेत याचीही माहिती घेण्यात येत आहे. प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांनाही क्वांरंटाइन केले जाणार आहे.
हे आहे आवाहन
बेकायदेशीररीत्या प्रवेश केलेल्यानी माहिती लपवून ठेवली तरी त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. बाहेरून बेकायदेशीर रित्या आलेल्या व्यक्तींची माहिती नागरिकांना कळल्यास त्यांनी (0831)2407290 या जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.