कोरोनाने शेतकऱ्यांना फोडला झेंडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:43+5:302021-04-24T04:23:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाबरोबर पैसा देणारे पीक म्हणून झेंडू, गुलाब, जरबेरा व बकुळाची फुले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाबरोबर पैसा देणारे पीक म्हणून झेंडू, गुलाब, जरबेरा व बकुळाची फुले घेण्याकडे कल वाढला आहे. कमी कालावधीत येणारी, उत्पादन खर्च माफक असल्याने व जादा फायदा देणारी फुलशेती आता कोरोनामुळे सण-समारंभाबरोबर देवळेही बंद असल्याने फुलांना मागणीच नसल्याने तोट्याची ठरत आहे. ती सांभाळताना येणारा खर्च थांबत नाही आणि उत्पन्न मात्र शून्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच भाजीपाला व इतर शेतीमालाला बाजारात मागणी आहे. पण लॉकडाऊनच्या नियमावलीत सर्व मंदिरे, सण, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभांना बंदी घातल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फुलांना मागणी नाही. झेंडू, जरबेरा, गुलाब, बकुळाच्या फुलांना विशेषतः लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव व देवदेवतांच्या पूजेसाठीच मागणी असते. पण सध्या सणसमारंभच काय देवळांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांची मागणी १०० टक्के घटली आहे. जिल्ह्यात करवीर शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील गावात फुलांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे छोटे शेतकरीही भाजीपाला, कोथिंबीर व झेंडू अशी आंतरपिके घेऊन व्यावसायिक शेती करतात. पण फुलांना मागणी नसल्याने येथील शेतकरी नेताजी मेढे यांनी २० गुंठ्यात २५ ते ३० हजार खर्च करून लावलेला झेंडू पहिला तोडा घेण्यासाठी उत्सुक असताना व किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळणार, या आनंदात असताना लॉकडाऊनमुळे फुकटातसुद्धा कोण फुले घेईनात, असे सांगितले. हा लॉकडाऊन १५ दिवस राहणार असला तरी फुलांची मागणी असण्यासाठी मंदिरे, धार्मिक व वैयक्तिक कार्यक्रमांवरील बंदी कधी उठणार, याचा अंदाज नाही. फुले नाशवंत असल्याने आणि ती ज्या त्या दिवशी तोडा नाही घेतला तर कोमेजतात. सध्या लॉकडाऊनमुळे बाजारच बंद आहे. यामुळे ती तोडली तरी अडचण, नाही तोडली तरी अडचण. याशिवाय उत्पादन चांगले असताना मागणी नसल्याने उत्पन्न नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
प्रतिक्रिया
आता फुले बहरू लागली आहेत. या दिवसांत यात्रा-जत्रा, लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम असतात. यामुळे झेंडूला चांगला दर व मागणी असते, म्हणून लागवड केली. पण लॉकडाऊनमुळे बाजार बंद तर कार्यक्रम नाहीत. आता ही फुले तोडून फेकून द्यावी लागत आहेत.
- नेताजी मेढे गणेशवाडी, ता. करवीर
(फोटो ओळी)
गणेशवाडी, ता. करवीर येथील शेतकरी नेताजी मेढे यांच्या शेतातील झेंडूची झाडे, फुले बहरली आहेत.