corona cases in kolhapur :लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे, आता जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 08:15 PM2021-05-04T20:15:36+5:302021-05-04T20:17:53+5:30
corona cases in kolhapur :गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरुन समाज माध्यमांवर टिकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-.यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरुन समाज माध्यमांवर टिकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-.यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली, मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमीदेखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरकरांनी संताप व्यक्त करत फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअपवर टिका करायला सुरूवात केली, गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत ट्रोल करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. तीनही मंत्र्यांच्यावतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करुन नागरिकांना १३ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.