corona cases in kolhapur : लॉकडाऊनच्या भीतीने सकाळी बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 08:24 PM2021-05-11T20:24:14+5:302021-05-11T20:25:34+5:30
CoronaVirus Market Kolhapur : येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेमुळे, तसेच येऊ घातलेल्या अक्षयतृतीया व रमजान ईदमुळे मंगळवारी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळली. विशेषत: लक्ष्मीपुरी धान्य बाजारात धान्याची आवकजावक झाल्याने वाहनांचीही कोंडी झाली. सकाळी आठ वाजेपासून साडेअकरा वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती.
कोल्हापूर : येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेमुळे, तसेच येऊ घातलेल्या अक्षयतृतीया व रमजान ईदमुळे मंगळवारी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळली. विशेषत: लक्ष्मीपुरी धान्य बाजारात धान्याची आवकजावक झाल्याने वाहनांचीही कोंडी झाली. सकाळी आठ वाजेपासून साडेअकरा वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती.
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन करावा लागेल, त्याशिवाय कोरोना संसर्गाची साखळी तुटणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार याची धास्ती नागरिकांमध्ये आहे. दोन दिवसांवर रमजान ईद, अक्षयतृतीया, शिवजयंती असे महत्त्वाचे सण आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी उसळली.
शहरातील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, महानगरपालिका परिसर, ताराबाई रोड, शिंगोशी मार्केट परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात वाजता सुरू झाली. तेव्हापासून रस्त्यावर वर्दळ सुरू झाली. लक्ष्मीपुरीत तर बाहेरून आलेले धान्याचे ट्रक, टेम्पो, हौदा रिक्षांच्या गर्दीने धान्य बाजारातील रस्त्यावर साडेआठ वाजताच वाहतुकीची कोंडी झाली होती. धान्यासह मिरच्या, मसाले घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती.
गुरुवारी रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवदेखील सकाळी लवकर खरेदीसाठी बाहेर पडले. सुका मेवा, शेवया, तसेच अन्य साहित्य खरेदीकरिता महानगरपालिका, बाजारगेट, काळाईमाम परिसरात दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. शिवाजी मार्केट येथेही अशी गर्दी होती. याशिवाय नेहमीप्रमाणे भाजी खरेदीकरिता शहरातील सर्वच मंडईत नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.
दुपारनंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली; परंतु वर्दळ सुरूच होती. काही दुकानदार दारात उभे राहून गिऱ्हाईक आले की त्यांना लागणारा माल देताना दिसत होते. सण असल्यामुळे या प्रकाराकडे पालिका व पोलीस प्रशासनाने डोळेझाक केली.