कृष्णा-पंचगंगा घाटावरील कोरोना सेंटर पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:17+5:302021-05-18T04:24:17+5:30
कुरुंदवाड : येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावरील पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू झालेले कोरोना सेंटर ओस पडले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढत ...
कुरुंदवाड : येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावरील पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू झालेले कोरोना सेंटर ओस पडले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पुन्हा पुढाकार घेऊन कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुमारे चाळीस बेडचे कोरोना सेंटर सुरू केले होते. प्रशस्त जागा, शुद्ध हवा, खुले वातावरण यामुळे शहरातील कोरोना रुग्णांसाठी चांगली सोय झाली होती.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार केली आहे. तर वीसहून अधिक मृत्यू झाले आहेत. सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासकीय कोविड सेंटर फुल आहेत. खासगी कोविड सेंटरमध्ये काही प्रमाणात बेड शिल्लक असले तरी सेवा शुल्क सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्ण भरतीसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
घाटावरील कोरोना सेंटरमध्ये बेडची व्यवस्था आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी आपले राजकीय वजन वापरल्यास ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय केल्यास शहरातील सर्वसामान्य कोरोना रुग्णांना आधार होईल आणि खऱ्या अर्थाने सेवकाची भूमिका पार पाडल्याचा आनंदही होईल. राजकारण आणि श्रेयवादात व्यस्त असलेल्या नगरसेवक, नेत्यांनी कोरोना सेंटर सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशी मागणी शहरवासीयातून होत आहे.