गोकुळच्या शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:14 PM2021-04-17T17:14:35+5:302021-04-17T17:17:00+5:30
CoronaVirus GokulMilk Kolhapur : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते गोकुळचे ठरावधारक असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.
कोल्हापूर : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते गोकुळचे ठरावधारक असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.
गोकुळचीनिवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे. त्यात सत्तारूढ गटाने न्यायालयीन लढाई सुरू ठेवल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हाच मुद्दा घेऊन सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यात गोकुळ निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. गाठीभेटी सुरू असल्या तरी संसर्ग होण्याची भीती इच्छुक उमेदवारांसह ठरावधारकांमध्ये आहे. वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. शनिवारी डोणोली येथील सदाशिव पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहू मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे गोकुळच्या ठरावधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गोकुळच्या मतदानासाठी पंधरा दिवस राहिले आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते माजी सरपंच वैशाली पाटील यांचे दीर, तर ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील यांचे भाऊ होत.