स्वत:ची मोटार दिली कोरोना रुग्णांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:49+5:302021-05-03T04:17:49+5:30
कोल्हापूर : बडोदास्थित कोल्हापूरचे उद्योजक प्रदीप पांडुरंग जाधव हे कोरोना संसर्गातही कोल्हापूरकरांच्या मदतीला धावून आले. कोरोना वाढता प्रार्दुभाव पाहून ...
कोल्हापूर : बडोदास्थित कोल्हापूरचे उद्योजक प्रदीप पांडुरंग जाधव हे कोरोना संसर्गातही कोल्हापूरकरांच्या मदतीला धावून आले. कोरोना वाढता प्रार्दुभाव पाहून स्वत:ची मोटार चालकासह गरजू रुग्णांच्या सेवेकरिता दिली आहे. सध्या ती मोटार गरजू रुग्णांच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयात सज्ज आहे. ही सेवा ते मोफत पुरविणार आहेत.
कोल्हापुरी माणूस म्हटले की, तो जगाच्या कानाकोपऱ्या कुठेही नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाला तरी त्याची नाळ कायम या भूमीशीच जुळलेले असते. महापूर असो वा नैसर्गिक आपत्ती अशा वेळी पहिला हा कोल्हापूरकर कोल्हापूरच्या मदतीसाठी धावून येतो. असेच मूळचे घुणकी (ता. हातकणंगले) येथील प्रदीप जाधव व्यवसायानिमित्त बडोद्यात स्थायिक झाले आहेत. तेथे २०१० साली ते नोकरीसाठी गेले होते. दोनच वर्षांत त्यांनी स्वत:चा व्यवसाय तेथे सुरू केला. आजच्या घडीला ते रेल्वेसाठी लागणारे पार्ट्सचे दर्जात्मक तपासणी केंद्र व इतर औद्योगिक उत्पादनांची निर्मिती करतात. त्यांनी कोरोना महामारीत आपल्या कोल्हापूरकर भगिनी बांधवांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू होऊ नये. याकरिता रुग्णवाहिकांची संख्या मर्यादित असल्याचे पाहून त्यांनी स्वत:ची मोटार चालकासह मोफत सेवेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात सज्ज ठेवली आहे. विशेष म्हणजे प्रदीप हे या मोटारमध्ये केवळ दोनच वेळे बसले आहेत. त्यात ते स्वत: लागेल तेवढे पेट्रोलही ते पुरवीत आहेत. याशिवाय दोन चालकही त्यांनी तैनात केले आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ७८४१०७३७६२ या क्रमांकावर गरजूंनी संर्पक साधण्याचे आवाहनही केले आहे.
ऑक्सिजन निर्मितीसाठी जागा देण्याचा मनोदय
जाधव यांचे कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पाच हजार स्क्वेअर फुटांचे दोन प्लाॅट आहेत. त्यापैकी एकावर सरकारने ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा. त्याकरिता जागा देण्यासही त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाने संपर्क
साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोट
आपली माणस चांगली धडधाकट असली तरच पैशाचा उपयोग आहे. तो काय? छातीवर बांधून न्यायचा काय? म्हणून खारीचा वाटा म्हणून मी मोटार चालकासह माझ्या कोल्हापूरच्या माणसांसाठी सज्ज ठेवली आहे. त्याचा लाभ घ्यावा.
-प्रदीप जाधव, उद्योजक, बडोदा
फोटो : ०२०५२०२१-कोल-आम्ही कोल्हापुरी
ओळी : कोल्हापुरातील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. याकरिता स्वत:ची मोटार रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज ठेवली आहे.