कोरोना निर्बंध लागले, आम्हाला नाही कळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:24+5:302021-03-18T04:22:24+5:30
कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असेल या भीतीने राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले. जिल्हाधिकाऱ्यांनी अंमलबजावणीचे आणि ...
कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असेल या भीतीने राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले. जिल्हाधिकाऱ्यांनी अंमलबजावणीचे आणि कारवाईचे आदेशही काढले; पण जनतेमध्ये त्याचे काही गांभीर्यच नसल्याची वस्तुस्थिती आहे. एकवेळ ताेंडाला मास्क लावलेला दिसेल; पण सोशल डिस्टन्सच्या नावाने शंखच आहे. कोरोना नावाचा काही प्रकारच नाही या अविर्भावात लोक बिनधास्तपणे वावरत आहेत, लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत. खासगी, सरकारी कार्यालये पूर्वीसारखीच हाऊसफुल्ल आहेत. विशेष म्हणजे कारवाई करणाऱ्या पथकांचाच शोध घ्यावा लागत आहे.
या महिनाअखेरपर्यंत कोरोनाचे कठोर निर्बंध लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतने रिॲलिटी चेक केले असता वरील वास्तव समोर आले. सोमवारपासून राज्यभर निर्बंध लागू झाले आहेत. यात नो मास्क नो एन्ट्री, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व कार्यालये, लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टाॅरन्टमध्ये ५० टक्के उपस्थिती, असे नियम लागू केले आहेत; पण प्रत्यक्षात फिरून पाहणी केल्यावर यापैकी एकाचेही पालन होत नसल्याचे दिसते. कोरोना आहे याचाच विसर पडल्यासारखी परिस्थिती सार्वजनिक ठिकाणी आहे. मास्कची सक्ती आहे, म्हणून मास्क तोंडावर लावलेले दिसतात; पण बहुतांश वेळी ते हनुवटीवर लटकताना दिसतात. दोन माणसांच्या मध्ये किमान तीन फुटांचे अंतर असावे, असा नियम; पण प्रत्येक ठिकाणी घोळका करून बसलेलेच चित्र दिसते.
टाऊन हॉल बसस्टॉप : वेळ १२.१५
सीपीआर चौकात टाऊन हॉल बसस्टॉपवर कॉलेज युवक, युवतींसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठा घोळका जमलेला. बसच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण तिष्ठत उभा राहिलेला, तर कुणी बाकड्यावर बसलेला. किमान ५० भर तरी लोक तेथे दाटीवाटीने उभे राहिलेले. यातील निम्म्या जणांच्या तोंडावर मास्कच नव्हता. कॅमेरा बघून हनुवटीवरचा मास्क चेहऱ्यावर ओढण्याचा प्रयत्न होत होता.
आंबेवाडी पेट्रोल पंपाजवळील मंगल कार्यालय : वेळ १२.२५
येथे तर चक्क धूमधडाक्यात लग्न समारंभ सुरू होता. मेन हॉल, जेवणावळी आणि लाॅन या तिन्ही ठिकाणी तुडुंब गर्दी होती. वाहने लावतानाच सुरक्षारक्षकाकरवी वाहने हॉलच्या मागील बाजूस लावा, पुढे तपासणी होते, असे सांगून वेगळीच पळवाट शोधली जात होती. लग्नात नटूनथटून आलेल्यांपैकी एकाच्याही ताेंडावर मास्क दिसत होता. कुठेही सॅनिटायझरची सोय नव्हती. ५० व्यक्तींचा नियम सरळ सरळ मोडला गेलेला होता. ५० ऐवजी ५०० माणसे दिसत होती.
करवीर पंचायत समिती : १२. ४०
सीपीआर चौकातच असलेल्या करवीर पंचायत समितीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्वच कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती. ५० टक्के उपस्थितीबाबत अजून काही सांगण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. नियमितपणे कामकाज चालते तसेच सुरू होते. कुठेही कोरोनाचे निर्बंध आहेत याचे भान नव्हते. ताेंडापेक्षा हनुवटी आणि गळ्यावरच मास्क लटकत होता.
जिल्हाधिकारी कार्यालय : १२.५५
कोरोना निर्बंधाचे आदेश लागू केलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमांचे कसे बारा वाजवले आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. जिल्हाधिकारी बसतात त्या कार्यालयाच्या अगदी समोरील कार्यालयात कर्मचारी घोळका करूनच काम करताना दिसले. नेहमीप्रमाणे मास्क तोंडावर नव्हते. सोेशल डिस्टन्स नावाचा काही प्रकार आहे, याचीच कुणाला कल्पना नाही, अशा अविर्भावात महिला कर्मचारी वावरत होत्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया : १.०५
बसंत बहार रोडला लागूनच असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची परिस्थिती अन्य सरकारी कार्यालयांपेक्षा वेगळी नव्हती. दोन दिवसांची सुटी आणि दोन दिवसांच्या संपानंतर बँका सुरू झाल्याने साहजिकच गर्दी होती. सोशल डिस्टन्सच्या नियमांचे कोणतेही पालन होताना दिसत नव्हते. हॅण्ड सॅनिटायझरचा वापर फक्त सुरक्षारक्षकांकडून होताना दिसत होता. आलेले ग्राहक एकमेकांना खेटून बसले होते. रांगेत उभे होते. नियमांचे पालन करा, असे कोणीही आवाहन करताना दिसत नव्हते.
गोकुळ हॉटेल : १.२०
स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती. रेस्टाॅरन्टमध्येही ५० टक्के उपस्थितीचा नियम असल्याने आत डोकावले तर आशादायी चित्र दिसले. एकाआड एक टेबल अशी बैठकीची व्यवस्था केली होती. पाणी बाटलीचे बॉक्स ठेवून टेबलवर कुणी बसू नये अशी व्यवस्था केली होती. कर्मचाऱ्यांच्याही ताेंडावर मास्क होता.
फोटो:
१७०३२०२१-कोल-टाऊन हॉल
१७०३२०२१-कोल-आंबेवाडी
१७०३२०२१-कोल-करवीर पंचायत
१७०३२०२१-कोल-कलेक्टर ऑफिस
१७०३२०२१-कोल-स्टेट बँक
१७०३२०२१-कोल-गोकुळ हॉटेल
(सर्व छाया : आदित्य वेल्हाळ )