इचलकरंजीतील आठवडी बाजार ठरताहेत कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:06+5:302021-06-26T04:18:06+5:30
प्रशासनाची तारांबळ लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या भरारी पथकाने विकली मार्केटमधील आठवडी बाजारात नागरिकांची अँटिजन चाचणी केली. ...
प्रशासनाची तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या भरारी पथकाने विकली मार्केटमधील आठवडी बाजारात नागरिकांची अँटिजन चाचणी केली. यामध्ये १०३ पैकी १८ नागरिक पॉझिटिव्ह आले. यातील बहुतांश व्यापारी असून, ते बाहेर गावातील आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांना व्यंकटेश्वरा व मुसळे येथील कोविड केंद्रांमध्ये दाखल केले. त्यामुळे शहरातील आठवडी बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे.
या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात अद्याप कोरोना संसर्गाचा प्रभाव सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या भरारी पथकाने शुक्रवारी विकली मार्केटमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांची अॅँटिजन चाचणी केली. यामध्ये तारदाळ, शिरदवाड, शिवनाकवाडी, कुरुंदवाड, रेंदाळ, अब्दुललाट गावातील १६ व्यापारी व इचलकरंजी शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना व्यंकटेश्वरा व मुसळे येथील कोविड केअर केंद्रामध्ये दाखल केले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरपालिका प्रशासनाने आठवडी बाजार बंद केला होता. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच बाजार भरविण्याचे आदेश दिले होते. मात्र, रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होत असल्याने प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे नागरिक बेजबाबदारपणे बाजारात खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. सध्या शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरूच असून, दररोज रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी खबरदारीने राहिले पाहिजे; अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पथकात आरोग्य विभागाचे विजय पाटील, तानाजी कांबळे, प्रियांका भोसले, अर्चना उरणे, लावण्या बंडगर यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
फोटो ओळी
२५०६२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील विकली मार्केटमध्ये नागरिक पॉझिटिव्ह आल्याने थोरात चौकातील आठवडी बाजारात पोलिसांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
छाया : उत्तम पाटील