उत्तूर परिसरात वाढता कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:59+5:302021-06-17T04:16:59+5:30
रवींद्र येसादे उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांपैकी ९ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या ...
रवींद्र येसादे
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांपैकी ९ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या लाटेत ७०० कोरोनाबाधित आढळले. उत्तूरला सर्वाधिक रुग्ण असल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक बनला आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्ग ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळेच वाढत चालला आहे. मास्कचा वापर न करणे, प्रशासनाच्या सूचना न पाळणे, गृहअलगीकरणात राहून विनाकारण बाहेर फिरणे, स्वॅब देऊन आल्यानंतर अहवाल येईपर्यंत घरी न थांबता मोकाट फिरणे, दुकानात गर्दी करणे, लग्नसमारंभात होणारी गर्दी, आदी कारणांने कोरोना वाढत आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक विवाहित तरुणांना लाखो रुपये खर्चून जीव गमवावे लागलेत. काही वृद्धांचाही मृत्यू झाला आहे. वेळेत काळजी न घेतल्याने संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे उत्तूर परिसरात आहेत. त्यामुळे सर्वांनीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
गावनिहाय कोरोनाबाधित व कसांत मृत्यू : उत्तूर २८७ (९), बेलेवाडी ९ (२), धामणे १४, झुलपेवाडी २, आर्दाळ - १३ (१), हालेवाडी ५, पेंढारवाडी १३, चिमणे २५ (२), चव्हाणवाडी ६१ (३), वडकशिवाले ३९ (२), महागोंड ८७ (३), वझरे ५ (१), होन्याळी ३७ (२), पेंढारवाडी १३, करपेवाडी २९ (२), बहिरेवाडी ३२ (३), मुमेवाडी २२ (२)
* कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारी गावे
कोरोना संसर्ग होऊन कोरोनामुक्ती व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर दक्षता समित्यांनी प्रयत्न केल्याने झुलपेवाडी, चिमणे, चव्हाणवाडी, महागोंड, महागोंडवाडी, वझरे, होन्याळी, करपेवाडी, बेलेवाडी आदी गावे कोरोनामुक्त झाली असली तरी गावात पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे.
कोविड सेंटर फुल्ल
मुमेवाडी येथील मुकुंदराव आपटे फाउंडेशनचे कोविड सेंटर व उत्तूर येथील मुश्रीफ फाउंडेशन व लोकांच्या सहभागातून सुरू असलेले कोविड सेंटर ही दोनही सेंटर कोरोना रुग्णांनी भरली आहेत. दोन्ही सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सेवा मिळत आहेत.