कसबा बावड्यात कोरोनाचा संसर्ग थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:37+5:302021-06-02T04:19:37+5:30
: ३७० बरे होऊन घरी परतले कसबा बावडा : कसबा बावड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून ते ...
: ३७० बरे होऊन घरी परतले
कसबा बावडा : कसबा बावड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आतापर्यंत २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कसबा बावड्यात महापालिका प्रशासन कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु कोरोना कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. शुगरमिल, हनुमान तलाव, कसबा बावडा पूर्व, लक्ष्मी-विलास पॅलेस, पोलीस लाईन, बावडा पॅव्हेलियन अशा सर्वच प्रभागांत कमी-जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. एप्रिलपेक्षा मे महिन्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लक्ष्मी-विलास पॅलेस प्रभागातील काही गल्लीतील घराघरांतील सर्व व्यक्तींची कोरोनाची तपासणी घेण्यात आली. कोरोनाचे रुग्ण केवळ बावड्यातील गल्लीतच नाही तर वेगवेगळ्या मळ्यात राहणाऱ्या वस्तीमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
कोरोनाची साधारण लक्षणे दिसलेले अनेकजण सध्या गृहअलगीकरण झाले आहेत तसेच किरकोळ सर्दी, पडसे ताप अशा आजारावर स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. बावड्यातील बहुतेक सर्वच दवाखाने दिवसभर हाऊसफुल्ल असतात. पॅव्हेलियन मैदानावर सुरू करण्यात आलेले कोरोना सेंटर सध्या हाऊसफुल्ल आहे.
दरम्यान, लवकरच श्रीराम सोसायटीच्या हॉलमध्येही तब्बल दीडशे बेडचे मोठे अलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे नुकतेच आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले होते. त्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसात हे केंद्र सुरू होईल. हे सेंटर बावड्यासह शहरातील रुग्णांना मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी बावड्यातील भाजी मंडई, शुगरमिल कॉर्नर शंभर फुटी रोड येथे हलविण्यात आली आहे.