लहान मुलांमधील कोरोना संसर्ग आणि पालकांचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:39+5:302021-05-16T04:23:39+5:30
प्रश्न : मुलांसाठी दुसरी लाट पहिल्यापेक्षा कितपत गंभीर आहे..? उत्तर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप जास्त प्रमाणात ...
प्रश्न : मुलांसाठी दुसरी लाट पहिल्यापेक्षा कितपत गंभीर आहे..?
उत्तर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप जास्त प्रमाणात लोकांना संसर्ग होताना दिसत आहे, त्याच प्रमाणात मुलांनाही वाढत्या प्रमाणात संसर्ग दिसत आहे आणि याचे कारण कदाचित वायरसमधील म्युटेशन असू शकतो, त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये कोरोनाचे पेशंट कमी झाल्यानंतर सर्व लोकांनी दक्षता घेणं बंद केलं, त्यामुळेसुद्धा हा संसर्ग एकदम वाढला. त्यामध्ये मुलांची संख्या जास्त दिसत आहे.
प्रश्न : मी माझ्या मुलाला कोरोना व्हायरसपासून कसे वाचवू शकतो?
उत्तर : कोरोनापासून बचावासाठी कोणतेही औषध किंवा इंजेक्शन नाहीत, मोठ्या माणसांमध्ये आपण लसीकरण सुरू केले आहे. या लसीमुळे मोठ्या माणसांमधील आजाराचे प्रमाण नियंत्रणात आणले जाऊ शकते. लहान मुलांमध्ये लस वापरण्यास अजूनही परवानगी नाही, त्यामुळे मुलांपासून वाचण्यासाठी आपल्याला व्यवस्थित मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे व सॅनिटायझर वापरणे हे आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे आवश्यक आहे.
प्रश्न : जर माझ्या मुलाला ताप आला तर तो कोविडचा ताप आहे की नाही, कसे कळेल?
उत्तर : एखाद्या मुलाला ताप आला तर तो कोविडचा आहे की नाही, हे सांगणे खूप अवघड आहे. आत्ताच्या काळामध्ये जर ताप आला तर ही शक्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. जर त्या मुलाच्या कुटुंबामध्ये कोणाला संसर्ग झाला तर तो कोविडचा ताप असण्याची शक्यता जास्त आहे
प्रश्न : मुलांमध्ये कोविड संसर्गाची काय लक्षणे दिसतात?
उत्तर : प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये पोटदुखी, जुलाब होणे, उलटी होणे व अंगावर पुरळ येणे ही लक्षणे आहेत.
प्रश्न : मुलांमध्ये कोविडची टेस्ट कधी केली पाहिजे?
उत्तर : घरामध्ये कुणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर, जर मुलाला कोविडसदृश लक्षणे असतील तर किंवा मुलाचा ताप तीन ते चार दिवसाच्या वर जात असेल तर तातडीने चाचणी करून घ्या.
प्रश्न - कुटुंबामध्ये कोणी कोविड पॉझिटिव्ह असल्यास काय करावे?
उत्तर : आई व मूल दोघेही पॉझिटिव्ह असतील तर मुलाला आईजवळ ठेवण्यास काही हरकत नाही व मूल लहान असेल तर स्तनपान करू देण्यासही काही अडचण नाही. आई पॉझिटिव्ह आणि मूल निगेटिव्ह असल्यास आई बाळाची काळजी घेऊ शकते; परंतु आईने पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. आई, वडील किंवा घरातील इतर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर मुलांना आजी-आजोबांकडे ठेवू नये कारण यातून आजी-आजोबांना संसर्ग होण्याची भीती असते व त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांना या संसर्गामुळे जास्त धोका उदभवू शकतो
प्रश्न : मुले कोविडमुळे गंभीर होऊ शकतात का..?
उत्तर : सुमारे सत्तर टक्के मुले ही ज्यांना संसर्ग झालेला आहे; परंतु लक्षणे काहीच दिसत नाहीत, अशी असतात. काही मुलांना दोन-तीन दिवस ताप येऊ शकतो; परंतु एक ते दोन टक्के मुलांनाच अतिदक्षता विभागात दाखल करावे लागू शकते.
प्रश्न : कोणत्या मुलांना कोविडमुळे जास्त धोका उद्भवतो..?
उत्तर : ज्या मुलांना आधीपासून इतर काही आजार आहेत. त्यांची प्रतिकारशक्ती कमी करणारे कॅन्सर सारखे किंवा इमिनो लॉजिकल आजार असतील तर अशा मुलांना जास्त धोका उद्भवू शकतो
प्रश्न : जर माझे मूल कोविड पॉझिटिव्ह असेल तर मी कशाप्रकारे सल्ला घेतला पाहिजे..?
उत्तर : आपले मूल पॉझिटिव असेल तर आपण व्हिडिओ कन्सल्टींग करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण अशा मुलाला आपण क्लिनिकमध्ये घेऊन जाणे म्हणजे कदाचित हा संसर्ग इतरांना होण्याची भीती राहते; परंतु जर मुलांमध्ये गंभीर लक्षणे असतील तर डॉक्टरांना त्याची पूर्वकल्पना देऊन तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.
प्रश्न : जर तुमचा मुलगा-मुलगी पॉझिटिव्ह असेल तर त्याची घरी कशी काळजी घ्याल..?
उत्तर : नियमित ताप व ऑक्सिजन पातळी तपासा. दर सहा तासानंतर
जर ताप शंभरच्यावर असेल तर लगेच औषध द्या. भरपूर प्रमाणात पाणी व लिंबू सरबत, नारळ पाणी देऊ शकता. हलके जेवण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधे देऊ शकता.
प्रश्न : कोरोना होऊन गेल्यानंतर मुलांवर काय लक्ष ठेवायचे?
उत्तर : लहान मुलांना कोरोना होऊन गेल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर ३-४ आठवड्याने त्यांना मल्सिसिस्टम इनफ्लेमेंटरी सिंड्रोम (एमआयएस) हा आजार होऊ शकतो. या आजारात कोविडच्या ॲन्टीबॉडीजमुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवाना नुकसान होते. त्यामुळे रक्त तपासणी करून, लवकर निदान करून योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
फोटो : १५०५२०२१-कोल-डॉ साईनाथ पोवार-बालरोग तज्ज्ञ.