धक्कादायक : मान्यताप्राप्त नसलेल्या किटद्वारे कोल्हापूरात कोरोना तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:55 PM2020-07-01T15:55:47+5:302020-07-01T15:57:31+5:30
आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसर्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उघड केले. त्यांनी माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकिस आणला.
कोल्हापूर : आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसऱ्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उघड केले. त्यांनी माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकिस आणला.
देसाई म्हणाले, केंद्र शासनाच्या भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद, स्वास्थ अनुसंधान विभाग, स्वास्थ और परिवार कल्याण मंत्रालय (आर.सी.एम.आर.) या संस्थेमार्फत किटची तपासणी करुनच जे किट पात्र आहेत, त्याचीच खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी आवश्यक असणारे सव्वा कोटी रुपयांचे १२४ किट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी खरेदी केले. ज्या संस्थेकडून हे किट खरेदी केले, त्या संस्थेच्या बॅच नं. पीपी००००५-सी ०४२०००१ या किटला आय.सी.एम.आर.ने मान्यता दिली आहे. त्याच किटची प्रशासनाने सव्वा कोटी रुपये देऊन खरेदी केली. पण कंपनीने पुरवठा करताना खरेदी केलेल्या मान्यताप्राप्त ऐवजी पीपी००००५-सी ०५२०००४ या प्रमाणित न केलेल्या किट लॅबला देण्यात आल्याचे समोर आले आहे.
हे कोरोना चाचणी स्राव घेण्याचे अतिशय महत्वाचे किट असताना ते उपलब्ध झाल्यानंतर त्याची शहानिशा न करता त्याचा कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या शेंडा पार्कमधील लॅबमध्ये वापर सुरु केला आहे. त्यामुळे या मान्यता नसलेल्या १२४ पैकी ७३ किटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सद्या ५१ किट शिल्लक आहेत.