तिटवे येथील घारे कुटुंबीयातील दोघांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:33+5:302021-07-12T04:16:33+5:30
तिटवे, ता. राधानगरी येथील घारे कुटुंबीयातील संदीप नामदेव घारे आणि अंजना भीमराव घारे या घारे परिवारातील पुतण्या आणि चुलत ...
तिटवे, ता. राधानगरी येथील घारे कुटुंबीयातील संदीप नामदेव घारे आणि अंजना भीमराव घारे या घारे परिवारातील पुतण्या आणि चुलत चुलतीवर कोरोनाने झडप घातली. ही घटना काल मध्यरात्री घडली. त्यामुळे घारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आकस्मिकपणे घडलेल्या या घटनेमुळे तिटवे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजारांचा फैलाव ग्रामीण भागामध्ये जोरात होत आहे. त्यामुळे अनेक गावात रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तिटवे येथेही कोरोनाचे रुग्ण आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यासाठी संदीप घारे यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यातच त्यांनाही कोरोना झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून संदीप व अंजना घारे कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. दरम्यान, काल मध्यरात्री अंजना घारे यांचा तर थोड्या वेळाने संदीप घारे यांचा मृत्यू झाला. संदीप घारे हे एकुलते होते. कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आधार हरपला आहे. लागोपाठ एकाच गावातील दोन मृत्यू झाल्यामुळे परिसरात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दक्षता कमिटी आणि ग्रामपंचायतीने सतर्क राहून ग्रामस्थांना अधिक दक्ष राहण्यास व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साहाय्य करण्याची व कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.