corona in kolhapur-यात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:06 PM2020-04-03T19:06:08+5:302020-04-03T19:08:33+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.
कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.
दख्खनचा राजा श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा मंगळवारी (दि. ७) होत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा याचा लेखी आदेश वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीला पाठविण्यात आला आहे. सध्या संचारबंदी लागू असली तरी यात्रा काळात काही भाविक डोंगरावर येण्याची शक्यता गृहित धरून ग्रामपंचायतीने यात्रेच्या आदल्या दिवसापासूनच गाव शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे.
सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही. तर बाहेरुन आलेल्या नागरिकाला डोंगरावर प्रवेश मिळणार नाही. मानाच्या सासनकाठ्या हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते, मात्र सर्व सासनकाठी धारकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी फोन करून डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात निर्जंतुकीकरणाच्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे.