corona in kolhapur-सव्वापाच लाख महिलांच्या खात्यावर ‘जनधन’ची रक्कम जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:38 PM2020-04-09T17:38:39+5:302020-04-09T17:41:57+5:30
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या बँक खात्यांत जनधन योजनेची रक्कम जमा झाली आहे. जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही. उलट ती आपल्या खात्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँक तसेच एटीएमवर गरज नसताना पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅँक अधिकारी राहुल माने यांनी गुरुवारी येथे केले.
कोल्हापूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या बँक खात्यांत जनधन योजनेची रक्कम जमा झाली आहे. जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही. उलट ती आपल्या खात्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँक तसेच एटीएमवर गरज नसताना पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅँक अधिकारी राहुल माने यांनी गुरुवारी येथे केले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ज्या महिलांची प्रधनमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये बचत खाती आहेत, अशा खात्यांमध्ये केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला ५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यांपैकी एप्रिलच्या रकमा महिलांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या खात्यांवर ही रक्कम जमा झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ६१७ बँक शाखा आणि ६५८ एटीएम केंद्रे तसेच २८० बँक व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्रे उपलबध आहेत. महिला, पेन्शनर्स यांनी व इतर शासकीय लाभार्थ्यांच्या रकमा त्यांच्या बॅँक खात्यात सुरक्षित असून रकमा काढण्यासाठी अनावश्यक होणारी गर्दी करू नये. शासनाने सूचित केल्याप्रमाणे सामाजिक अंतर तसेच आपल्या आरोग्याची योग्य सुरक्षा घेऊनच रक्कम काढण्यासाठी बँक शाखा, एटीएम व व्यवसाय समन्वयक या ठिकाणी भेट द्यावी. तसेच कोणत्याही अफवा तसेच गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माने यांनी केले आहे.
सर्व बॅँकांना सामाजिक अंतराबाबत सूचना
जिल्ह्यातील सर्व बँकांना याबाबतीत सूचना देण्यात आल्या असून, सर्व बँका शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचना पाळून पैशांचे वितरण करीत आहेत. सर्व शाखा सामाजिक अंतर त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणाबाबतच्या सूचना पाळत आहेत. ग्राहकांनी या बाबतीत सर्व बँकेच्या शाखांना योग्य सहकार्य करून कोरोना साथीच्या रोगापासून आपला सर्वतोपरी बचाव करावा, असे आवाहन माने यांनी केले आहे.