corona in kolhapur-‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 03:54 PM2020-04-20T15:54:01+5:302020-04-20T16:01:41+5:30

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे. ...

corona in kolhapur - Don't read 'Ramadan' prayers, iftar publicly | corona in kolhapur-‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नका

corona in kolhapur-‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नका

Next
ठळक मुद्दे‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नकाघरातच धार्मिक कार्य करा; ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे निर्देश

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये आणि घराच्या अथवा इमारतीच्या छतावर, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, तरावीह, इफ्तार करण्यात येऊ नये. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित धार्मिक कार्य पार पाडावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव असणार आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह आणि इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावेत.

‘लॉकडाऊन’विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा या निर्देशामध्ये समावेश आहे. या सूचनांची माहिती मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांना देण्यात याव्यात, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना रविवारी पत्राद्वारे दिले आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार लॉकडाऊनच्या कालावधीत कोल्हापूरमधील सर्व मशिदी बंद राहणार आहेत. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ पाचजण नमाज अदा करतील. समाजबांधवांनी आपल्या घरातच तरावीहचे पठण करावे. बाहेरील व्यक्तीला घरात घेऊन तरावीहचे पठण करू नये. सार्वजनिकरित्या नमाज पठण, इफ्तार पार्टीचे आयोजन करू नये, असे आवाहन आम्ही शासनाचा आदेश येण्यापूर्वीच केले आहे.
-गणी आजरेकर, चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग

 

आरोग्य, जीवनाच्या हिताचे

रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग अथवा संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लिम समाज बांधवांच्या आरोग्य आणि जीवनाच्या हिताचे असल्याचे अल्पसंख्याक विकास विभागाच्या रविवारच्या पत्रात म्हटले आहे.
 

 

Web Title: corona in kolhapur - Don't read 'Ramadan' prayers, iftar publicly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.